IIT Bombay Sahil Wakode Case CCTV Footage: मुंबईतील IIT Bombayमध्ये बीटेकच्या द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या मृत्यूच्या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. साहिलच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर परीक्षेदरम्यानचा सुमारे 15 मिनिटांचा CCTV व्हिडिओ तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. दुपारी 12.30 ते 12.45 या वेळेतील या फुटेजमध्ये परीक्षा हॉलमध्ये नेमकं काय घडलं, याची माहिती मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई क्राइम ब्रँचकडून या CCTV फुटेजचा बारकाईने तपास सुरू आहे. एसीपी धर्मवीर बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, वर्गात आणि लॉबीमध्ये लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये परीक्षे दरम्यानचा घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे.
CCTV फुटेजनुसार, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास साहिल आपल्या जागेवर बसला होता. तो काही वेळ आपल्या खिशातील वस्तूकडे पाहताना दिसत असल्याचे तपासात समोर आले आहे. ही वस्तू मोबाइल फोन असल्याचा पोलिसांचा संशय आहे. प्रश्नपत्रिकेतील उत्तरांसाठी त्याने ChatGPTचा वापर केला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, कोर्स इन्स्ट्रक्टर आणि परीक्षा निरीक्षक प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांच्या निदर्शनास ही बाब आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांनी साहिलशी परीक्षा हॉलमध्येच चौकशी केली. पुढे साहिलला इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे करून परीक्षा हॉलच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचे CCTV फुटेजमधून दिसत असल्याचे वृत्त आहे.
परीक्षा दुपारी 1 वाजता संपणार होती. त्यामुळे परीक्षेच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या या घटनाक्रमाला तपासाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.
पोलिसांनी परीक्षा हॉलपासून हॉस्टेलपर्यंतच्या CCTV फुटेजचाही तपास केला आहे. त्यानुसार, परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्यानंतर साहिल दुपारी सुमारे 1.25 वाजता आपल्या हॉस्टेलच्या खोलीत पोहोचला.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, खोलीत प्रवेश केल्यानंतर साहिल पुन्हा बाहेर आल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसलेले नाही. त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणाचा तपास आता पवई पोलिसांकडून मुंबई क्राइम ब्रँचकडे वर्ग करण्यात येत आहे. सोमवारी एसीपी धर्मवीर बनसोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने साहिलच्या हॉस्टेलच्या खोलीची सखोल झडती घेतली. यावेळी पंचनामा करण्यात आला.
तपास पथकाकडून साहिलने कोणतीही चिठ्ठी किंवा सुसाइड नोट लिहून ठेवली होती का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सध्या खोलीतून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. मात्र साहिलचा मोबाइल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
यापूर्वी IIT बॉम्बेमध्ये घडलेल्या एका आत्महत्येच्या प्रकरणात सुरुवातीला सुसाइड नोट सापडली नव्हती. नंतर ती एका पुस्तकातून मिळाली होती. त्यामुळे यावेळी तपासात कोणतीही बाब दुर्लक्षित राहू नये, यासाठी पोलिसांकडून काळजीपूर्वक तपास केला जात आहे.
साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला असून, प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना आरोपी करण्यात आले आहे.
साहिलच्या वडिलांचा आरोप आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून साहिलसोबत जातीय भेदभाव करण्यात येत होता आणि त्याला मानसिक त्रास दिला जात होता.
मात्र, IIT बॉम्बेच्या फॅकल्टी फोरमकडून हा आरोप नाकारण्यात आला आहे. प्राध्यापकांनी केवळ परीक्षेचे नियम आणि शैक्षणिक शिस्त पाळल्याचा दावा फॅकल्टी फोरमने केला आहे.
आता CCTV फुटेज, साहिलचा मोबाइल आणि डिजिटल उपकरणे तसेच हॉस्टेलमधील इतर पुरावे तपासल्यानंतर या प्रकरणातील नेमका घटनाक्रम आणि साहिलच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या पोलिस तपास सुरू असून, CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या घटनांचा अर्थ आणि त्यांचा मृत्यूशी नेमका संबंध काय आहे, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.