IIT Bombay placements 2026 Pudhari
मुंबई

IIT Bombay placements 2026: आयआयटी कॅम्पसमध्ये सरासरी वेतन 26.45 लाखांवर

विद्यार्थ्यांच्या वेतनात मात्र लक्षणीय वाढ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: देशभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी स्वप्न मानल्या जाणाऱ्या आयआयटी मुंबईमधील यंदाच्या प्लेसमेंट हंगामात नोकरीच्या संधी काही प्रमाणात घटल्या असल्या, तरी विद्यार्थ्यांच्या वेतनात मात्र लक्षणीय वाढ झाली आहे.

जागतिक स्तरावरील आर्थिक अनिश्चितता आणि भरतीतील मंदीच्या पार्श्वभूमीवरही आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना सरासरी 26.45 लाख रुपयांचे वार्षिक वेतन मिळाले असून, तब्बल 70 टक्के विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.

आयआयटी मुंबईने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालानुसार, जुलै 2024 ते जून 2025 दरम्यान राबविण्यात आलेल्या प्लेसमेंट प्रक्रियेसाठी 2 हजार 469 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 हजार 40 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि 1 हजार 422 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या.

यामध्ये 65 आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांचाही समावेश होता. तसेच 260 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटपूर्व नोकरीच्या संधी स्वीकारल्या. डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात 1 हजार 272 विद्यार्थ्यांना, तर दुसऱ्या टप्प्यात 150 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, सल्लागार, वित्त, संशोधन-विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उत्पादन व्यवस्थापन क्षेत्रांतील 417 कंपन्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेत सहभाग घेतला होता.

त्यापैकी 368 कंपन्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोकऱ्या दिल्या. गतवर्षीच्या तुलनेत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा 2 टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी काही कंपन्यांनी भरतीची संख्या कमी केल्यामुळे नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 3.5 टक्क्यांनी घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नोकरीच्या संधी कमी झाल्या असल्या, तरी विद्यार्थ्यांच्या वेतनात मात्र मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. सरासरी वार्षिक वेतन 26.45 लाख रुपयांवर पोहोचले असून, ते गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 10 टक्क्यांनी अधिक आहे. मध्यम श्रेणीतील वेतन 20 लाख रुपये इतके राहिले. तसेच 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक वेतन मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

20 लाखांपेक्षा जास्त वेतन देणाऱ्या कंपन्यांची संख्या गतवर्षीच्या 123 वरून यंदा 150 पर्यंत वाढल्याचेही स्पष्ट झाले आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील 96 कंपन्यांनी 429 नोकऱ्या दिल्या, तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 124 कंपन्यांनी 393 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या. त्यापैकी 99 कंपन्यांनी 320 विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या.

बी.टेक अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या 946 विद्यार्थ्यांपैकी 829 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेत सहभाग घेतला आणि त्यातील 678 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. बी.टेक आणि एम.टेक दुहेरी पदवी अभ्यासक्रमातील 250 विद्यार्थ्यांपैकी 171 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. एम.टेक अभ्यासक्रमातील 582 विद्यार्थ्यांपैकी 367 विद्यार्थ्यांची निवड झाली, तर एम.एस्सी. अभ्यासक्रमातील 207 पैकी 79 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या.

बी.टेक अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या 946 विद्यार्थ्यांपैकी 829 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेत सहभाग घेतला आणि त्यातील 678 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. बी.टेक आणि एम.टेक दुहेरी पदवी अभ्यासक्रमातील 250 विद्यार्थ्यांपैकी 171 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. एम.टेक अभ्यासक्रमातील 582 विद्यार्थ्यांपैकी 367 विद्यार्थ्यांची निवड झाली, तर एम.एस्सी. अभ्यासक्रमातील 207 पैकी 79 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या.

विभागनिहाय प्लेसमेंटमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. या विभागातील 293 विद्यार्थ्यांपैकी 258 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. या विभागासाठी 107 कंपन्यांनी भरती प्रक्रिया राबवली. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागात 346 पैकी 244 विद्यार्थ्यांना, मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागात 334 पैकी 213 विद्यार्थ्यांना, सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात 210 पैकी 133 विद्यार्थ्यांना, तर केमिकल इंजिनीअरिंग विभागात 161 पैकी 98 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या.

मेटलर्जिकल इंजिनीअरिंग आणि मटेरियल सायन्स विभागातील 209 पैकी 97 विद्यार्थ्यांची निवड झाली. दरम्यान, यंदा पीएच.डी. विद्यार्थ्यांचा प्लेसमेंटमधील सहभाग वाढला असला, तरी नोकऱ्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कमी विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. 2024-25 मध्ये नोंदणी केलेल्या 247 विद्यार्थ्यांपैकी 28 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या.

गतवर्षी ही संख्या 32 होती. मात्र पीएच.डी. विद्यार्थ्यांचे सरासरी वेतन 18.46 लाखांवरून 19.64 लाखांपर्यंत वाढले. अनेक पीएच.डी. विद्यार्थी पोस्ट-डॉक्टोरल फेलोशिप, संशोधन, स्टार्टअप्स किंवा उच्च शिक्षणाचे पर्याय निवडत असल्याने प्लेसमेंट प्रक्रियेत त्यांचा सहभाग तुलनेने कमी असल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT