मुंबई ः देशाच्या इतिहासावर असलेले मुघल काळाचे आणि ब्रिटीश वसाहतवादाचे सावट पुसून टाकण्यासाठी नामांतराचा मार्ग अवलंबणाऱ्या केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान मंत्र्यांनी ‘आयआयटी बॉम्बेच्या नावातील बॉम्बे तसेच ठेवले, त्याचे मुंबई केले नाहीत, हे चांगलेच झाले,’ असे विधान केले. सोमवारी आयआयटी मुंबईच्या पी. सी. सक्सेना सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी क्वाण्टम-तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड आदी विषयांवर भाष्य करताना आयआयटी मुंबईच्या नावावर ही टिपण्णी केली.
मुंबईला ब्रिटिशांनी दिलेल्या ‘बॉम्बे’ या नावाबाबतही हीच भूमिका अपेक्षित असताना आणि राज्य सरकारने अधिकृतपणे मुंबई हे नाव स्वीकारले असताना केंद्रीयमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटीत एका कार्यक्रमात बोलताना ‘जोपर्यंत आयआयटी बॉम्बेचा प्रश्न आहे, तुम्ही नावात बॉम्बे कायम ठेवले आणि त्याचे मुंबई केले नाही, याबद्दल देवाचे आभारच आहेत. आयआयटी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना आहेत,’ असे वक्तव्य केले. केंद्रीय मंत्र्यांनी शासनाच्या नामांतराच्या भूमिकेविरोधात प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेच्या कार्यक्रमात विधान केल्याने उपस्थितांमध्ये चर्चेला उधाण आले.
जगातील सर्वात गुंतागुंतीच्या गणिती आणि वैज्ञानिक समस्या काही क्षणांत सोडवणे, नवीन औषधांच्या शोधाची प्रक्रिया महिन्यांऐवजी काही दिवसांत पूर्ण करणे हे आता क्वाण्टम तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे. यासाठी देशातील 100 अभियांत्रिकी महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमध्ये क्वाण्टम-प्रशिक्षण प्रयोगशाळा उभारण्याची योजना राबवली जात असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्रालयाचे सचिव डॉ. अभय करंदीकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, बी. टेक अभ्यासक्रमातील गौण (मायनर) विषय म्हणून क्वाण्टम तंत्रज्ञानाबद्दल शिकवले जाणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या विषयासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही एआयसीटीईने तयार केला आहे. त्यासाठी काही व्हीडिओ तयार झाले आहेत, अशी डॉ. अभय करंदीकर यांनी दिली.
क्वाण्टम कम्प्युटिंग, क्वाण्टम कम्युनिकेशन व क्वाण्टम सेन्सर क्षेत्रांतील संशोधनाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुंबई, चेन्नई, दिल्ली येथील आयआयटी व आयआयएससी बंगळुरू येथे मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे, अशी माहिती विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.
देशात तयार होणार द्रवरूपी हेलियम
क्रायोजेनिक इंजिनपासून एमआरआय मशीनपर्यंत वापरला जाणारा द्रवरूपी हेलियम देशात आयात होत होता. पण आयआयटी मुंबईत द्रवरूपी हेलियम तयार करण्याची प्रयोगशाळा सुरू झाली असून देशातील संशोधन संस्थांसाठी ही सुविधा खुली झाल्याचे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. डॉ. शिरीष केदारे यांनी सांगितले.