मुंबई : आयआयटी ‘बॉम्बे’चे मुंबई केले नाही, हे चांगले झाले, या केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानावरून मुंबईत चांगलाच वाद पेटला असून सिंह यांच्या वक्तव्याचा पश्चात्ताप म्हणून भाजपच्या नेत्यांनी मराठी माणसाची माफी मागून शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर पश्चात्ताप करावा, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने जोरदार हल्ला चढवला.
मनसेचे नेते गजानन काळे म्हणाले, मुंबई आणि मराठी माणसाचा अपमान करण्याची आणि त्यांना हिणवण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार आता कुठल्या बिळात लपून बसले आहेत? आपले केंद्रीय नेते जितेंद्र सिंह यांचा जाहीर निषेध करण्याची हिंमत आहे का? पुढच्या वेळी जितेंद्र सिंह मुंबईत येतील तेव्हा त्यांचा उचित सन्मान आणि सत्कार करण्याचे काम मनसे करील, असा इशाराही काळे यांनी दिला.
अंधेरीच्या डोनाल्ड डकची पकपक
भारतीय जनता पार्टीचा मुंबई महानगरपालिकेवर डोळा असून जितेंद्र सिंह हे त्याच पक्षाचे महाभाग असल्याची संतप्त टीका ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी केली. मुंबई महानगरपालिका ही बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नाही. सिंह यांनी आपल्या मागासलेल्या राज्याच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे, मुंबईबद्दल बोलू नये, असा सल्ला देतानाच अंधेरीचे डोनाल्ड डक, जे सतत पकपक करत असतात, त्यांनी आता हिंमत असेल तर त्यांना जाब विचारावा, असे आव्हानही चित्रे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना दिले.