पुढारी ऑनलाईन डेस्क
आयआयटी बॉम्बेने (IIT Bombay placements) २०२४ च्या शैक्षणिक वर्षासाठीचा प्लेसमेंट अहवाल प्रसिद्ध केला आहे. नोकरीसाठी नोंदणी केलेल्या एकूण २,४१४ विद्यार्थ्यांपैकी केवळ १,९७९ विद्यार्थ्यांनी या प्लेसमेंट प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यापैकी १,४७५ म्हणजेच ७५ टक्के विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर मिळाल्या. यात विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक २३.५० लाख पॅकेजच्या (IIT Bombay average salary package) नोकऱ्या मिळाल्या.
कॅम्पस ड्राईव्हमध्ये १,९७९ विद्यार्थ्यांचा सहभाग, १,४७५ जणांना प्लेसमेंट मिळाली.
२२ विद्यार्थ्यांनी १ कोटी आणि त्याहून अधिक रकमेच्या पॅकेजची ऑफर मिळवली.
५५८ विद्यार्थ्यांना सुमारे २० लाखांच्या वार्षिक पॅकेजची ऑफर मिळाली.
२३० जणांना १६.७५ ते २० लाखांच्या दरम्यान वार्षिक पॅकेजची ऑफर.
१० विद्यार्थ्यांना ४ लाख ते ६ लाखांच्या वार्षिक पॅकेजसह नोकरी.
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना सरासरी वार्षिक २१.८ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते. त्यात यंदा (2024 placement season) ७.७ टक्क्यांनी वाढ झाली. पण, मागील वर्षीच्या तुलनेत कॅम्पस ड्राईव्हधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. तर या वर्षी IIT-B मधून भरती करणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत १२ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
२२ विद्यार्थ्यांनी १ कोटी आणि त्याहून अधिक रकमेच्या पॅकेजची ऑफर मिळवली. आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांसाठी ७८ ऑफर स्वीकारण्यात आल्या. सुमारे ३६४ कंपन्यांनी जवळपास १,६५० नोकऱ्या दिल्या. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कॅम्पस ड्राईव्हमध्ये कमी विद्यार्थी होते.
द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी IIT-B प्लेसमेंटमधील सर्वात कमी पॅकेज वार्षिक ६ लाख रुपये होते. यावर्षी हे पॅकेज आणखी कमी होऊन ते ४ लाख रुपयांवर आले. कॅम्पसमधील १० विद्यार्थ्यांनी ४ लाख ते ६ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह नोकरीच्या ऑफर स्वीकारल्या आहेत.
१२३ कंपन्यांनी दिलेल्या एकूण ५५८ ऑफरमध्ये त्यांचे एकूण कॉम्पेनसेशन पॅकेज २० लाख रुपयांपेक्षा जास्त होते आणि २३० ऑफर ह्या १६.७५ लाख ते २० लाख रुपये पॅकेजच्या दरम्यान होत्या. "या वर्षी, IIT-B मधून भरती झालेल्या कंपन्यांमध्ये १२ टक्के वाढ नोंदवली. दोन्ही टप्प्यात एकूण ७८ आंतरराष्ट्रीय ऑफर स्वीकारण्यात आल्या, तर या कॅम्पस ड्राईव्हदरम्यान वार्षिक १ कोटी रुपयांहून अधिक पगाराच्या २२ ऑफर स्वीकारण्यात आल्या," असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
"युक्रेनमधील युद्ध परिस्थिती आणि मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेमुळे यंदा आंतरराष्ट्रीय भरती करणाऱ्यांची संख्या कमी राहिली." याव्यतिरिक्त, ७७५ विद्यार्थ्यांना भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये (MNC) संधी मिळाली आहे आणि ६२२ भारतीय कंपन्यांमध्ये रुजू होतील.