IIT Bombay Pudhari
मुंबई

IIT Bombay : आयआयटी मुंबईतील राजकीय हस्तक्षेप थांबवा!

१७५ हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आयआयटी मुंबईचे शैक्षणिक वातावरण राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवावे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन आयआयटी मुंबईच्या १७५ हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी केले आहे.

गेल्या महिनाभरात संस्थेत घडलेल्या घडामोडींचा परिणाम सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा, शैक्षणिक कामगिरी, मानसिक आरोग्य आणि भविष्यातील संधींवर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, अलीकडील घटनांची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती द्यावी, अशी मागणीही त्यांनी जाहीर निवेदनामध्ये केली आहे.

आयआयटी मुंबईच्या परिसरात राजकीय पक्षांनी हस्तक्षेप टाळावा आणि संस्थेच्या शैक्षणिक स्वरूपाचे जतन करावे. राजकीय मतभेद किंवा पक्षीय संघर्ष यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक दबावाशिवाय परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागावे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होणार नाही, याची संबंधित घटकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

विद्यार्थ्यांना आपल्या भूमिका आणि विचार शांततापूर्ण मार्गाने मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. या अधिकाराचा आदर केला पाहिजे, अशी भूमिका निवेदनात मांडताना त्यांनी सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे, यावरही भर दिला आहे.

  • आयआयटी मुंबईतील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाला गती द्यावी आणि संपूर्ण प्रकरणातील तथ्ये निष्पक्षपणे समोर आणावीत. चौकशी पारदर्शक, निष्पक्ष आणि वेळेत पूर्ण झाल्यास संबंधित घटनांबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT