प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
मुंबई

Non-Veg Restaurants : 'धार्मिक भावना दुखावणारी होती; मग व्हेज-नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्‍ये ऑर्डर का दिली?'

ग्राहक न्‍यायालयाचा तक्रारदारांना सवाल : रेस्टॉरंटवर दाखल तक्रार फेटाळली

पुढारी वृत्तसेवा

तुम्‍ही फक्‍के शाकाहारी आहात. मांसाहरी अन्‍नाचे सेवन केल्‍याने तुमची धार्मिक भावना दुखावणारी होती; मग व्हेज' - 'नॉनव्हेज' दोन्ही प्रकारचे पदार्थ देणाऱ्या रेस्टॉरंटमध्‍ये ( Non-Veg Restaurants) का ऑर्डर दिली?, असा सवाल करत मुंबई उपनगर ग्राहक तक्रार निवारण आयोग (अतिरिक्त) यांनी मांसाहारी अन्न दिल्या प्रकरणी रेस्टॉरंटवर दाखल केलेली तक्रार फेटाळली.

चिकन मोमोज दिल्‍या प्रकरणी  ६ लाखांच्‍या भरपाईची मागणी

यासंदर्भात 'टाईम्‍स ऑफ इंडिया'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, मुंबईतील दादरमधील दोघांनी डिसेंबर २०२० मध्‍ये मुंबईतील सायन भागातील एका रेस्टॉरंटमध्‍ये मोमोज आणि सॉफ्ट ड्रिंक ऑर्डर केले होते. शाकाहारी मामोज असे दोनवेळा सांगितले होते. मात्र त्यांना चिकन मोमोज देण्‍यात आले. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे आणि आउटलेटवरील फलकावर 'कॉम्बो'साठी स्पष्टपणे शाकाहारी किंवा मांसाहारी पर्याय दिले नव्‍हते. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्याने त्यांची माफी मागितली. तोडगा काढण्‍याची विनंती केली. यानंतर कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आपल्याला मानसिक त्रास, भावनिक धक्का बसला असून, धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत दोघांनी ६ लाख रुपयांची भरपाईची मागणी ग्राहक न्‍यायालयात केली होती.

परतावा मिळाल्‍याने 'ते' ग्राहक नाहीत : रेस्टॉरंटचा युक्‍तीवाद

रेस्टॉरंटने आपल्‍या युक्‍तीवादत दावा केला की, संबंधिता ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अंतर्गत "ग्राहक" नाहीत कारण त्यांना परतावा मिळाला होता. त्यांनी शाकाहारी आणि मांसाहारी पर्याय स्पष्टपणे पाहिले होते. तक्रार पुस्तिका आणि ईमेलवर त्‍यांना तक्रार करता आली असती पण त्‍यांनी ती केली नाही. अनावश्यक त्रास दिल्‍याने तक्रारदारांचे पैसे परत केले आहेत. त्यांच्या वर्तनाला न जुमानता, तक्रारदारांना सद्भावना म्हणून १२०० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देखील देण्यात आले होते; परंतु त्यांनी प्रत्येकी ३ लाख रुपयांची मागणी केली होती, असा युक्‍तीवाद रेस्टॉरंटच्‍या वतीने ग्राहक न्‍यायालयात करण्‍यात आला.

काय म्‍हणाले ग्राहक न्‍यायालय?

प्रदीप जी कडू आणि गौरी एम कापसे यांचा समावेश असलेल्या मुंबई उपनगर ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (अतिरिक्त) स्‍पष्‍ट केले की, कोणताही विवेकी व्‍यक्‍ती आपण खात असलेले अन्‍न शाकाहारी आहे की मांसाहारी हे ओळखू शकतो. रेस्टॉरंटच्‍या बोर्डवर जेवणात मांस असू शकते हे स्पष्टपणे नमूद केलेले नाही. पण त्‍यावर शाकाहारी किंवा मांसाहारी असा उल्लेख आहे. तसेच मांसाहारामुळे धार्मिक कार्यक्रमात बाधा आली असा कोणताही पुरावा आढळलेला नाही. पूजा किंवा धार्मिक समारंभांचे स्वरूप, नाव, तारीख आणि ठिकाण देखील त्यांनी उघड केले नाही, असेही ग्राहक न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. तुम्‍ही फक्‍के शाकाहारी आहात. मांसाहरी अन्‍नाचे सेवन केल्‍याने संबंधितांची धार्मिक भावना दुखावणारी होती; मग त्‍यांनी व्हेज' - 'नॉनव्हेज' दोन्ही प्रकारचे पदार्थ देणाऱ्या रेस्टॉरंटमधून का ऑर्डर दिली?, असा सवाल तक्रारदारांना करत रेस्टॉरंटवर दाखल केलेली तक्रार ग्राहक न्‍यायालयाने फेटाळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT