आयबी, केंब्रिज, आयसीएसई शाळांचा खर्च डोईजड pudhari photo
मुंबई

Private school fees hike : आयबी, केंब्रिज, आयसीएसई शाळांचा खर्च डोईजड

आता महापालिकेची सीबीएसईसाठी संमती पत्रे; पालकांमध्ये फसवणूक झाल्याची भावना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आंतरराष्ट्रीय शिक्षण मोफत मिळण्याच्या आकर्षणापोटी पालिकेच्या आयबी, केंब्रिज आणि आयसीएसई शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आता फसवणूक झाल्याची भावना आहे. या शाळांचे शिक्षण मंडळ बदलून सीबीएसई करण्याचा विचार पालिका करत असून त्यासाठी संमती पत्रे भरण्यास पालकांना सांगितले जात आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावाखाली पालिकेने डॉलर्स आणि पाऊण्ड्स खर्च करून केंब्रिज आणि आयबी या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शाळा सुरू केल्या. तसेच एक आयसीएसई शाळाही सुरू केली. विविध टप्प्यांवर या शाळांना घ्यावी लागणारी संलग्नता, शिक्षक प्रशिक्षण, पाठ्यपुस्तके, इत्यादींचा खर्च आता पालिकेला डोईजड होऊ लागला आहे.

तुलनेने सीबीएसई शाळा कमी खर्चिक आहेत. त्यामुळे केंब्रिज, आयबी आणि आयसीएसई शाळांचे शिक्षण मंडळ बदलून तेथे सीबीएसई लागू करण्याचा पालिकेचा विचार आहे. याबाबतचे वृत्त दै. पुढारीच्या 4 जानेवारी 2026च्या अंकात प्रकाशित झाले होते. आता या शाळांतील पालकांकडून संमती पत्रे भरून घेतली जात आहेत.

या मंडळांच्या खासगी शाळा परवडणाऱ्या नाहीत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय शिक्षण मोफत देण्याची जाहिरात करत पालिकेने केंब्रिज, आयबी आणि आयसीएसई या मंडळांची प्रत्येकी एक शाळा आणि सीबीएसईच्या 20 शाळा सुरू केल्या.

पालकांनी जाहिरातींना भुलून या सर्व शाळांमध्ये आपल्या मुलांना घातले. काही पालकांनी आपल्या मुलांना खासगी शाळांमधून काढून पालिकेच्या शाळेत घातले. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय मंडळ बंद करून तेथे सीबीएसई सुरू करण्याला पालकांचा विरोध आहे.

शाळेची सद्यस्थिती

आयबी शाळा सुरू झाल्यापासून पालकांना विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी पालिकेशी भांडावे लागत आहेत. शिक्षक मिळावेत, शुद्ध पाणी मिळावे म्हणून संघर्ष करावा लागला. अद्याप येथे सीसीटीव्ही नाहीत. कला आणि क्रीडा विषयांसाठी पूर्णवेळ शिक्षक नाहीत. खासगी आयबी शाळांमध्ये पालकांनी जे वातावरण अनुभवले ते पालिकेच्या आयबी शाळेत मिळत नाही. त्यामुळे काही पालकांना ही शाळा निवडल्याचा पश्चात्ताप होत आहे. काहींनी आपल्या मुलांना या शाळेतून काढले आहे. केंब्रिज आणि आयसीएसई शाळेची स्थिती काही प्रमाणात अशीच आहे.

शिक्षण मंडळ बदलण्यास पालकांनी संमती दिली नाही तर शाळा बंद होण्याची भीती घातली जात आहे. आयबीचे प्रशिक्षण घेतलेले केवळ एकच शिक्षक सध्या आहेत. शिक्षक उपलब्ध नसल्याने शाळा सीबीएसई केली जात असल्याचे सांगितले जाते; मात्र त्यानंतरही प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध होतील, याची काय खात्री ? आम्ही सर्व पालकांनी संघर्ष करून पालिकेडून शिक्षक मिळवले, पिण्याचे शुद्ध पाणी मिळवले. अद्याप शाळेत सीसीटीव्ही लावलेले नाहीत.
राजन शुक्ला, पालक, आयबी शाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT