गणेश शिंदे
मुंबई: राज्यात सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य करूनही वाहनधारकांचा हलगर्जीपणा कायम असल्याचे समोर आले आहे.अवघ्या १५ दिवसांत परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी ४६ हजार वाहनांची तपासणी केली असता तब्बल १० हजार वाहने जुन्याच नंबर प्लेटवर धावताना आढळली.
या वाहनांवर कारवाई करीत सुमारे १७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून मुदत संपल्यानंतरही एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
केंद्र सरकारने वाहनांची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी एचएसआरपी नंबर प्लेटची संकल्पना आणली.वाहन चोरी रोखणे,पोलिस यांना वाहने ओळखायला सोपे व्हावे हा उद्देश घेऊन सरकारने सर्वप्रकारच्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट एप्रिल २०१९ अनिवार्य केली. मात्र; सरकारने नंतर एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना एचएसआरपी अनिवार्य केले.
त्यासाठी १७ जुलै २०२४ अंतिम मुदत होती.त्यानंतर १५ ऑगस्ट,३० नोव्हेंबर व ३१ डिसेंबर २०२५ अशी तीन वेळा तर ३० जून २०२६ ही चौथी शेवटची मुदतवाढ देत एक जुलैपासून कारवाईचा बडगा उगारू, असे परिवहन विभागाने सांगितले होते.
त्याप्रमाणे; परिवहन व वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या एक जुलैपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली.गेल्या पंधरा दिवसात सर्वप्रकारच्या ४५ हजार ५७० वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.त्यामध्ये १० हजार ४३७ वाहने एचएसआरपी विनानंबरप्लेट आढळून आली.
एचएसआरपी नसल्यास वाहनचालकाला १ हजार रुपयांचा दंड लागू केला जातो. या कारवाईमधून सुमारे १७ लाख ७४ हजार रुपयांचे दंडात्मक शुल्क सरकारकडे जमा झाले.एचएसआरपी नंबर प्लेट एकदा बसविल्यावर ती काढता येत नाही.दहा अंकी कोड व नकली नंबर प्लेट ओळखण्यास मदत होते. वाहन चोरीला गेल्यास ते ट्रॅक करणे सोपे बनते असे एचएसआरपीचे वैशिष्ट्य आहे.
गेल्या दीड वर्षात वाहनचालकांना ४ वेळा एचएसआरपीची मुदत वाढवून दिली होती.आता ती दिली जाणार नाही.एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनचालकांवरील कारवाईचा बडगा सुरु राहणार आहे.-शैलेश कामत, सहपरिवहन आयुक्त (आयटी),मुंबई