मुंबई : मुंबईमध्ये 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कधीही होऊ नये म्हणून एचपीव्ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून, शनिवारी या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अजमेर (राजस्थान) येथून करण्यात आला. मुंबईसह महाराष्ट्रातील मोहिमेचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीत नायर रुग्णालयात करण्यात आला.
14 वर्षे पूर्ण मात्र 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींची निवड या मोहिमेसाठी करण्यात आली आहे. राज्यात सुमारे 1.30लाख 14 वर्षांवरील मुली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात महापालिका शाळांमधील 24,936 मुलींचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात खासगी व अनुदानित शाळांतील विद्यार्थिनींचे लसीकरण करण्यात येईल.
लसीकरण मोहीम पुढील तीन महिने सलग राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. महापालिकेच्या 236 आरोग्य केंद्रे, 27 प्रसूतिगृहे, 16 सर्वसाधारण रुग्णालये आणि 5 वैद्यकीय महाविद्यालये अशा एकूण 284 आरोग्य संस्थांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (कझत) मुळे होतो आणि लसीकरणाद्वारे टाळता येणारा हा एकमेव कर्करोग मानला जात असल्याने या मोहिमेत ‘गार्डसिल-4’ (-4) लसीची 0.5 मिली मात्रा डाव्या दंडावर स्नायूमध्ये दिली जात आहे. हे लसीकरण ऐच्छिक असून पालकांची संमती आवश्यक आहे.
सध्या महापालिकेला 20,160 लसींच्या मात्रा प्राप्त झाल्या आहेत. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 262 वैद्यकीय अधिकारी, 1008 परिचारिका आणि 4428 आशा सेविका व आरोग्य स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.