How to identify Analog Paneer:
मुंबई : राज्यात पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या अॅनालॉग किंवा दुग्धेतर पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर राज्य सरकारने एक वर्षासाठी बंदी घातली आहे. राज्यभरातील तपासणीत पनीरचे ३५.४ टक्के नमुने विहित मानकांशी विसंगत आढळल्याने आणि अनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पतीजन्य स्निग्धांशाचा वापर झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता अनेकांना प्रश्न पडतो की, अस्सल पनीर आणि ॲनालॉग पनीर यांमधील फरक कसा ओळखायचा?
ॲनालॉग पनीर हा पारंपरिक पनीरला एक दुग्धजन्य नसलेला पर्याय आहे. दुधातील फॅट्स किंवा घटक काढून त्याऐवजी वनस्पतीजन्य तेल, डालडा किंवा इतर दुधाव्यतिरिक्तच्या वस्तू वापरून बनवलेल्या पदार्थाला अॅनालॉग किंवा दुग्धेतर पनीर म्हटले जाते.
मात्र, राज्यभरातून गोळा केलेल्या नमुन्यांच्या तपासणीत निकृष्ट किंवा असुरक्षित असल्याचे आढळले. तपासणीत अनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पतीजन्य स्निग्धांश वापरण्यात आल्याचेही निष्पन्न झाले. आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, या घटकांमुळे हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल आणि शरीरात दीर्घकालीन दाह निर्माण होण्याचा धोका वाढतो.
आहारतज्ज्ञ आणि फिटनेस प्रशिक्षक निधी शेट्टी यांनी अस्सल पनीर आणि ॲनालॉग पनीर यांमधील फरक ओळखण्यासाठी एक सोपी युक्ती सांगितली. त्या म्हणाल्या, "आयोडिन किंवा बिटाडिन चाचणी करून हे ओळखता येते. पनीरचे काही तुकडे पाण्यात उकळा, ते थंड होऊ द्या आणि त्यानंतर त्यात आयोडिन किंवा बिटाडिनचे काही थेंब टाका. जर त्याचा रंग निळा किंवा काळा झाला, तर ते ॲनालॉग पनीर आहे असे समजावे."
अन्न आणि औषध प्रशासनाने इशारा दिला आहे की, ॲनालॉग पनीर हे अस्सल पनीर म्हणून ग्राहकांना देणे म्हणजे त्यांची दिशाभूल करण्यासारखे आहे. तसेच, 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६' अंतर्गत हा एक 'अयोग्य व्यापार प्रकार' मानला जाईल आणि त्यासाठी कठोर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. झालेल्या हानीच्या तीव्रतेनुसार, शिक्षेचे स्वरूप सहा महिन्यांपर्यंतचा कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ते जन्मठेप आणि किमान १० लाख रुपयांचा दंड (असुरक्षित अन्न खाल्ल्याने मृत्यू झाल्यास) अशा श्रेणींमध्ये असेल.