Excise duty on liquor
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील शुल्कात अचानक केलेल्या वाढीमुळे राज्यातील हॉटेल आणि बार व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. ही नवी वाढ अन्यायकारक आहे. ती तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा हॉटेल्स आणि बार बंद ठेवून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (एएचएआर) दिला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकताच मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या मते, गेल्या काही काळात परवाना शुल्क आणि इतर करांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक उत्पादन शुल्कात मोठी वाढ केल्याने व्यवसायाचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. याचा उत्पादन शुल्कात अचानक मोठी वाढ केल्यामुळे याचा फटका ग्राहकांबरोबचर हॉटेल व बार व्यावसायिकांना बसणार असल्याचे इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने म्हटलं आहे.
सरकारने अचानक आणि मोठी शुल्कवाढ लादली आहे. यामुळे केवळ हॉटेल आणि बारच्या व्यवसायावरच नाही, तर ग्राहकांवरही मोठा बोजा पडणार आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांनाही याचा फटका बसेल आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होईल. सरकारने असे निर्णय घेण्यापूर्वी व्यावसायिकांचे मत जाणून घेणे आवश्यक होते, अशी अपेक्षाही असोसिएशनने व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने ही शुल्कवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी हॉटेल आणि बार व्यावसायिकांनी केली आहे. जर सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर आगामी विधानसभा अधिवेशनाच्या काळात राज्यभरातील हॉटेल्स आणि बार बंद ठेवून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने दिला आहे.