मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या दोघांना एसयूव्ही अलिशान कारने चिरडले. File Photo
मुंबई

मुंबईत पुन्हा हिट अँड रन! वर्सोवा बीचवर SUV कारने दोघांना चिरडले

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुंबईत आणखी हिट अँड रनची घटना घडली आहे. मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर (Mumbai Versova Hit and Run) झोपलेल्या दोघांना एसयूव्ही अलिशान कारने चिरडले. यातील एका ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुसरा एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १२ ऑगस्टच्या पहाटे घडली.

रिक्षाचालक गणेश यादव आणि बबलू श्रीवास्तव अशी दोघांची नावे आहेत. हे दोघेजण शहरातील उष्ण आणि दमट वातावरणातून थंडावा मिळावा म्हणून वर्सोवा समुद्रकिनारी झोपले होते. पण त्यांना अलिशान कारने चिरडले.

या घटनेत श्रीवास्तव यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. या घटनेनंतर कार चालक आणि त्याचा मित्र कारमधून बाहेर आले. पण दोघे गंभीर जखमी झाल्याचे आणि लोक जमा होऊ लागल्याचे पाहून त्यांनी कारमधून घटनास्थळावरून पळ काढला, असे पोलिसांनी सांगितले.

Mumbai Versova Hit and Run : नेमकं काय घडलं?

त्यानंतर बबलू श्रीवास्तव आणि गणेश यादव यांना तातडीने शहरातील कूपर रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्यावर आणि हाताला जोरदार मार लागल्याने श्रीवास्तव अचानक जागा झाला. त्यानंतर त्याला एक कार त्यांच्या शेजारी झोपलेल्या गणेशच्या अंगावरून जाताना दिसली.

दोघांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

या प्रकरणी कार चालक निखिल जावळे (३४) आणि त्याचा मित्र शुभम डोंगरे (३३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या घटनेच्या वेळी ते दारूच्या नशेत होते की नाही हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले आहेत.

याआधी घडलेल्या हिट अँड रनच्या घटना

गेल्या महिन्यात झालेल्या अशाच एका हिट अँड रन घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्या पती जखमी झाला होता. वरळी येथील शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शाह याने चालवलेल्या बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या स्कूटरला धडक दिली होती. ७ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत ॲनी बेझंट रस्त्यावर बीएमडब्ल्यूने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला धडक दिली होती. या अपघातात कावेरी नाखवा यांना स्कूटीसह जवळपास १.५ किमीपर्यंत फरफरट नेले. या घटनेत नाखवा यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती प्रदीप जखमी झाले होते.

२२ जुलै रोजी मुंबईत भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली होती. यात दोन्ही रिक्षांचे चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले होते. २० जुलै रोजी मुंबईतील आणखी एका घटनेत वरळी परिसरात भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT