मुंबई : मालाडमध्ये २०२२ मध्ये २४ वर्षीय तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हिट अँड रन प्रकरणात उच्च न्यायालयाने पोलिसांना कडक शब्दांत फटकारले. एका तरुणाचा हकनाक बळी गेला. मात्र हे प्रकरण पोलिसांनी अतिशय निर्दयीपणे हाताळल्याचे आम्हाला स्पष्टपणे दिसून येत आहे, असा ठपका ठेवत न्यायालयाने पोलिसांचे कान उपटले.
मालाड येथील हिट ॲण्ड रन प्रकरणात १७ ऑगस्ट २०२२ रोजी एफआयआर दाखल करूनही पोलिसांनी निष्क्रियता दाखवली आहे. पोलिसांच्या अपयशाकडे लक्ष वेधत मृत तरुणाची आई बबिता पवन झा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. यावेळी खंडपीठाने पोलिसांच्या निष्क्रियतेचा समाचार घेतला. त्यानंतर बांगूर नगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाने कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे आदेश देखील खंडपीठाने दिले.
याचिकाकर्त्या पवन झा यांचा मुलाच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिली. मालाडमधील न्यू लिंक रोडवरील रौनक मशिदीजवळ झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मागे दुसऱ्या स्कूटरवरून चाललेल्या याचिकाकर्त्या झा यांनी ती घटना पाहिली होती. पण त्या क्षणाच्या मानसिक धक्यामुळे त्यांना ट्रकचा नोंदणी क्रमांक लक्षात आला नव्हता. पोलिसांनी अपघाताची सखोल चौकशी केली नाही. तीन वर्षे उलटूनही आरोपी ट्रकचालकाचा शोध घेतला नाही, असा दावा पवन झा यांनी न्यायालयात केला. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढले आणि कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले. याचिका निकाली काढताना ट्रायल कोर्टाला एका वर्षात कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले आणि याचिकाकर्त्या पवन झा यांना मोटार अपघात दावे न्यायाधिकरणासमोर भरपाईसाठी दाद मागण्याचे स्वातंत्र्य दिले.