Ajit Pawar
मुंबई : महाराष्ट्राच्या गौरवशाली ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी आणि पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. ७) पार पडलेल्या बैठकीत राज्यातील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या सुशोभीकरण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी कामांसाठी सरकारने तब्बल ३५८.८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
आज ताराराणी समाधी, अजिंक्यतारा किल्ला आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांसह राज्यातील अनेक ऐतिहासिक स्थळांच्या विकास व संवर्धनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित विभागांकडून सदर स्थळांबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. सदर वारसा स्थळांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा जपत ती पर्यटकांसाठी आकर्षण ठरतील, त्या पद्धतीनं त्यांचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली. या कामांसाठी सरकारने ३५८.८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून राज्यातील तीन महत्त्वाच्या स्थळांचा विकास करण्यात येणार आहे.
ताराराणी समाधी सुशोभीकरण या प्रकल्पासाठी १३३ कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे.
अजिंक्यतारा किल्ला सुशोभीकरणासाठी १३५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी ९०.८९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.