दादर : प्रभादेवी स्थानकावरील 125 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक एल्फिन्स्टन पुलावर सोमवारी सांयकाळी शेवटचा हातोडा मारण्यात आला आणि हा पूल अखेर इतिहासजमा झाला.
वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पामध्ये हा एल्फिन्स्टन दुमजली बांधण्यात येणार आहे. मात्र येथील 19 इमारती बाधित होत असल्याने स्थानिकांनी आधी पुनर्वसन, नंतरच पाडकाम अशी भूमिका घेतल्याने हे पाडकाम रखडले होते. मात्र वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे बहुतांश काम होत आल्याने यामुळे बाधित होणाऱ्या 83 कुटुंबांचे त्याच परिसरात म्हाडाकडून एमएमआरडीएकडे प्राप्त होणाऱ्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय घेत सप्टेंबर 2025 मध्ये या पुलाचे पाडकाम हाती घेण्यात आले होते.
या कामामुळे परिसरात गेले चार महिने वाहतुकीची गंभीर ससम्या निर्माण झाली होती. अखेर सोमवारी या पाडकामावर शेवटचा हातोडा मारण्यात आला असून हा ऐतिहासिक पूल इतिहासजमा झाला आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजूने पाडकाम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएतर्फे लवकरच नवीन पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
नवीन पुलाची पायाभरणी
या ठिकाणी दुमजली (डबल-डेकर) उड्डाणपूल बांधला जात आहे, जो मुंबईतील पहिला असा पूल असेल. शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टरला जोडणे आणि पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारणे, ज्यामुळे (अटळ सेतू) आणि वांद्रे-वरळी सी लिंक यांना जोडणी मिळणार आहे.