मुंबई ः कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या पालकांना मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी पश्चिम उपनगरातील आपल्या निवासस्थानाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी मुलाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करताना मुलाला खडे बोल सुनावले. न्यायमूर्ती जितेंद्र एस. जैन यांच्या एकल पीठाने पालकांना पूर्ण आदर देण्याचे, प्रेम आणि काळजी घेण्याचे निर्देश दिले.
एवढेच नव्हे तर त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय झाल्यास गय केली जाणार नाही, आदेशाचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिली. वडिलांना तीन मुले आहेत. एक मुंबईत, दुसरा नवी मुंबईत आणि तिसरा कोल्हापूरमध्ये राहतो. वडिलांना त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी नियमितपणे मुंबईला जावे लागते.
पालकांना मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी पश्चिम उपनगरातील त्यांच्या निवासस्थानाचा वापर करण्यापासून रोखण्यास कनिष्ठ न्यायालयाने 2018 मध्ये नकार दिला होता. त्या निर्णयाविरोधात मुलाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अपीलबाबत नाराजी व्यक्त करत श्रावण बाळाचा उल्लेख केला.
कुठे कावडीतून आपल्या माता-पित्याला तीर्थयात्रेला घेऊन जाणारा श्रावणबाळ आणि आपल्या आजारी, वृद्ध पालकांची काळजी घेण्याचे नैतिक कर्तव्य बजावण्याऐवजी प्रतिबंधात्मक आदेशासाठी न्यायालयात खेचणारा मुलगा... ही खेदाची बाब आहे. आजच्या युगात आपल्या संस्कृतीत रुजवण्यात आलेली नैतिक मूल्ये इतकी घसरली आहेत की, आपण आपल्या पालकांना तीर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या आणि वाटेतच आपले जीवन अर्पण करणाऱ्या श्रावणकुमारला विसरलो आहोत, अशी खंत व्यक्त करीत मुलाला पित्यास रुग्णालयात दाखल करण्याबरोबरच त्याच्या पत्नीने वडिलांचे स्वागत व आदरातिथ्य करून उपचारादरम्यान मदत करावी, त्यांच्या उपचाराचा खर्चही करावा, असे अंतरिम आदेश दिले आहेत.