मुंबई उच्च न्यायालय  pudhari file photo
मुंबई

High Court : नोकरीवर असताना मृत्यू झाल्यास कामामुळेच झाला म्हणू शकत नाही!

कुर्ल्यातील कुटुंबीयांना भरपाई नाकारली; हायकोर्टाचा निर्वाळा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : केवळ नोकरीवर असताना किंवा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाला म्हणून तो मृत्यू कामामुळेच झाला, असे म्हणू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. हा निर्वाळा देतानाच न्यायालयाने कुर्ल्यातील मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांचा भरपाईचा दावा मान्य करण्यास नकार दिला.

अपघात आणि वैयक्तिक दुखापत यामध्ये आकस्मिक संबंध असला पाहिजे, तसेच व्यक्तीला झालेली दुखापत वा अपघात आणि रोजगार यात आकस्मिक संबंध पाहिजे, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले.

बसचालक असलेल्या ब्रिजल यादवचा तो काम करीत असणाऱ्या कंपनीच्या बसमध्ये 16 डिसेंबर 2021 रोजी मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू ड्युटीवर असल्याने झाल्याचे निदर्शनास आणून देत यादव कुटुंबियांनी भरपाईसाठी दावा केला होता. त्यांचा दावा मुंबईतील कामगार न्यायालयाने मान्य केला होता. त्या निर्णयाला आव्हान देत अर्जुन ट्रॅव्हल्सने उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्यावर न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने निर्णय दिला.

कंपनीत काम करणाऱ्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच हंगामी कर्मचारीदेखील भरपाईचा दावा करुन शकतात. मात्र इतर गोष्टींची पूर्तता असणे आवश्यक असते. या प्रकरणातील उपलब्ध पुराव्यांनुसार कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनरी धमनी रोगामुळे झाला आहे. तथापि, केवळ नोकरीदरम्यान मृत्यू झाला म्हणून कामाचे स्वरूप हेच मृत्यूचे एकमेव कारण असल्याचे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

  • कर्मचाऱ्याचा मृत्यू आणि रोजगार यांच्यात संबंध असणे आवश्यक आहे. मृत्यू नैसर्गिक कारणामुळे देखील असू शकतो. ते पुरेसे नाही, असे न्यायमूर्ती मोडक यांनी स्पष्ट करत कुटुबियांचा भरपाईचा दावा मंजूर करणाऱ्या कामगार न्यायालयाचा 6 ऑगस्ट, 2024 रोजीचा आदेश रद्दबातल ठरवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT