

Gondhal Marathi Movie
अनुपमा गुंडे
प्राचीन परंपरेत शुभकार्य निर्विघ्नपणे संपन्न होण्यासाठी गोंधळ घालण्याची प्रथा आहे. लग्नाच्या वेळी पूर्वी इतका साग्रसंगीत घातला जात नसला तरी आजही ही प्रथा सुरू आहे. यथासांग गोंधळ घालण्याच्या या समृध्द परंपरेत प्रेम आणि सत्तेसाठी आसुलेल्या मानवी मनांचा ठाव घेत दिग्दर्शकांनी सांगितलेली ही कथा आहे.
हे कथानक घडते तो काळ अगदी घरोघरी वीज नसलेला काळ असावा. कारण चित्रपटाचा 90 टक्के भाग रात्रीचा अर्थात मशाली, दिवट्या आणि बुधल्याच्या प्रकाशाने व्यापला आहे. या पिवळसर प्रकाशात दिग्दर्शकाने मानवी मनाच्या विविध छटांवर लख्ख प्रकाश टाकला आहे. चित्रपटाची कहाणी आजच्या काळाला म्हणावी तशी नवी नाही, प्रेम आणि सत्तेसाठी हव्यासाने नाती, मानवी भावना यांना सहज मूठमाती देणारी माणसं एका बाजूला तर दुसरीकडे या जगाचा थांगपत्ता नसणारी निरागस, पापभीरू माणसं.
भिवबा (किशोर कदम) हा गावातील चारित्र्यसंपन्न आणि आर्थिकदृष्ट्याही संपन्न असलेल्या पाटलांच्या घरी गोंधळ घालण्यासाठी निघाला आहे. रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्याचा नातू विष्णू (धुव्र ठोके) आणि भिवबाचे साथीदार यांच्यात संवाद सुरू आहे. कंदीलाच्या प्रकाशात सुरू असलेल्या यांच्या वाटचालीत भिवबाच्या मुलगा गायब झाला असून त्याचा पोलीस तपास सुरू असल्याचे उलगडते. या मागे या पाटील घराण्याचे दुसरे भाऊबंद असलेला सर्जेराव (निषाद भोईर) त्याचे वडील मोठे पाटील आबासाहेब यांचा हात असतो. हे पाटील पिता- पुत्र दहशतीचा वापर करून पाटीलकीचा रूबाब मिरवत असतात.
भिवबा ज्या पाटलांच्या घरी गोंधळ घालायाला चाललाय. तिथली नवी नवरी सुमन (इशिता देशमुख) सर्जेराव तिच्या प्रेमात वेडा झाला आहे. तर सुमनला पाटलीणबाई होण्याची हौस असल्याने ती सर्जेरावाच्या प्रेमाला साद घालत असते. हे असं कथानक मध्यांतरपर्यंत चालते. चित्रपटाच्या उत्तरार्धात सुमनच्या आयुष्यात ती ज्याच्यावर प्रेम करत असते तो साहेबराव (अनुज प्रभू) ची गोंधळात एन्ट्री होते. मग हा प्रेमाचा त्रिकोण आणि ज्याचाशी सुमनचे लग्न झाले आहे तो आनंदा (योगेश सोहनी) याचे काय होते हे पाहण्यात मजा आहे.
पूर्वी गावोगावी चालणाऱ्या गोंधळाची परंपरा अजून अस्तित्वात असली तरी ती वेळेच्या आणि सादरीकरणाच्या मापदंडात समाजात खूपच सीमित झाली आहे. त्यामुळे सर्वात प्रथम गोंधळ या प्रथेतील बारकावे टिपण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शक संतोष डावखर यशस्वी झाले आहेत. तसेच लग्नकार्यातील गावाचे वातावरण, हुंडा प्रथा, रूसवे - फुगवे, चेष्टा मस्करी यांना ओघवता स्पर्श केला आहे. मुलाच्या जाण्याने नातवामुळे जगण्यासाठी हतबल असलेला किशोर कदमांचा गोंधळी भिवबा लक्षात राहतो. सुरेश विश्वकर्मा यांनी आबासाहेब पाटलांच्या रूपात साकारलेला खलनायक आणि निषाद भोईर यांनी मिशावर ताव मारणारा स्त्रीलंपट आणि रांगडा सर्जेराव जुन्या मराठी चित्रपटातील पाटलांच्या भूमिकेची आठवण करून देतात.
सुमनने उभी केलेली नवी नवरी आणि प्रेयसी दोन्ही भूमिका छान वठवल्या आहे. माधवी जुवेकरांची सासू गावच्या घरातल्या कर्त्या आणि समजतूदार स्त्रीची आठवण देतात. निरागस मनाचा नवरदेव ते सुमनचे खरं रूप कळल्यानंतरचा आनंदामध्ये झालेल्या बदलाचे दर्शन योगेश सोहनीने करून दिले आहे. बाकी संपूर्ण चित्रपट अंधार आणि पहाटे फटफटतांना आणि लख्ख प्रकाशात बाहेर येणारे सत्य याचा प्रतीकात्मक ताळमेळ दिग्दर्शकाने सुरेख केला आहे.
चित्रपटात आनंदा छोट्या विष्णूला मुका जीव असलेल्या कोंबड्याला झाकू देत नाही, चित्रपटाच्या शेवटी मात्र तोच आनंद या कोंबड्याला डालीतून मुक्त करतो, कोंबडं कितीही झाकलं तरी ते आरवायचं राहत नाही. तसेच सत्य कितीही लपवलं तरी घनदाट अंधारानंतर कधीतरी प्रकाशात येतेच. हा संदेश चित्रपट नकळत देतो. बाकी इलिया राजाच्या संगीताने या गोंधळाला चार चांद लावले आहेत. पारंपरिक संगीतावर ठेका धरावासा वाटतो. सहकलाकारही उत्तमच.