मुंबई : मुंबई शहर, उपनगरांतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी 1 फेब्रुवारीपासून नवीन वाहतूक नियम लागू केले असून गर्दीच्या वेळी सकाळी व संध्याकाळी अवजड वाहनांना शहरात बंदी घालण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार, सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
मुंबईतील दळणवळण सुरळीत होण्यासाठी अनेक प्रकल्प कार्यान्वीत झाले आहेत तर काही प्रकल्प सुरू आहेत. यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीतही झाली आहे. असे असले तरी अवजड वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी ही समस्या कायम असल्याने वाहतूक पोलिसांनी नवीन वाहतूक नियम लागू केले आहेत. त्यानुसार अवजड वाहनांना मुंबईतील प्रमुख रस्ते, उड्डाण पूल आणि एक्सप्रेस वेवर बंदी लागू करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईत सकाळी 7 ते रात्री 12 या वेळेत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सर्वच प्रकारच्या जड वाहनांना पूर्ण बंदी असणार आहे. रात्री 12 ते सकाळी 7 या वेळेतच प्रवेश मिळणार आहे. मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेवर जड वाहनांना पूर्णतः बंदी राहील. फक्त बससेवा याला अपवाद असणार आहेत.
कोणती वाहने सुरू राहतील?
या बंदीतून भाजीपाला, दूध, ब्रेड, बेकरी पदार्थ, पिण्याचे पाणी,पेट्रोल, डिझेल, रॉकेल, रुग्णवाहिका, शालेय बस, शासकीय व निमशासकीय वाहने, लक्झरी बसेसना शहरात परवानगी असेल.
पार्किंग नियमही कडक
जड वाहनांना सार्वजनिक रस्त्यांवर पार्किंगला मनाई करण्यात आली आहे.फक्त खासगी, भाड्याच्या किंवा अधिकृत पे- अँड-पार्किंगमध्येच उभी करता येणार आहेत. पाणीपुरवठा ठिकाणांजवळ फक्त दोन पाण्याचे टँकर थांबू शकणार आहेत.