पुढारी ऑनलाईन डेस्क
राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पुढील आठवड्यात राज्यातील काही भागांत पाऊस (Weather Forecast) पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विदर्भ, कोकण आणि गोव्यातील काही भागांत १८ ते २० ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची (Heavy rainfall) शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. पुढील ७ दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील मोठ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील ५ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानात ४-५ दिवसात मोठा बदल झालेला नाही. विदर्भात पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सरासरी ५३ टक्के पावसाची नोंद झाली. त्यानंतर ९ ते १० ऑगस्टपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला. सध्या तुरळक ठिकाणी वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे.
दरम्यान, गंगेच्या पश्चिम बंगालवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे पुढील ३-४ दिवसांत पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या मान्सून ट्रफ सरासरी समुद्रसपाटीवर त्याच्या सामान्य स्थितीच्या जवळ आहे. या आठवड्यातील बहुतांश दिवसांत ते त्याच्या सामान्य स्थितीच्या जवळ असण्याची शक्यता आहे.