Maharashtra Rain File Photo
मुंबई

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर कायम; पूर, महापुरामुळे जनजीवन विस्कळीत

नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात पावसाचा जोर कायम असून, बहुतांश भागात मध्‍यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकणासह पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, ठाणे, नाशिक, सोलापूर तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक सखल भाग जलमय झाले असून, काही ठिकाणी पूर व महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील खडकवासला आणि कुकडी प्रकल्‍प धरणसाखळीत पाण्याची आवक वाढल्याने नियंत्रित विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने भीमा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांवर प्रशासनाचे लक्ष आहे. नाशिक जिल्ह्यात गोदावरी खोऱ्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढल्याने काही ठिकाणी नियंत्रित विसर्ग सुरू आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत घाटरस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या, तर काही ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पुणे जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सिंहगड किल्ला तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी शेतजमिनींमध्ये पाणी शिरल्याने भात, सोयाबीन, भाजीपाला आणि इतर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

धोकादायक ठिकाणी प्रवेश टाळण्याच्या सूचना

राज्यभरात आपत्ती व्यवस्थापन पथके, महसूल प्रशासन, पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्था सतर्क असून, नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धोकादायक ठिकाणी प्रवेश टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांना आवाहन

भारतीय हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, नदीकाठच्या भागांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. काही जिल्ह्यांसाठी २ ते ५ ऑगस्टदरम्यान पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT