मालाड : रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.  pudhari photo
मुंबई

Mumbai Rain News : पहिल्‍याच पावसाने मालाड, कांदिवलीत पाणीच पाणी

प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.

पुढारी वृत्तसेवा

मालाड : मुंबईत गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसाने मालाड रेल्वे स्थानक ते कुरार हायवे या महत्त्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. अनेक ठिकाणी रस्त्यांचे स्वरूप अक्षरशः नदीसारखे झाले होते. परिणामी कार, बस, टॅक्सी, ट्रक, दुचाकी तसेच शालेय बससेवेवर मोठा परिणाम झाला. अनेक दुचाकी पाण्यात बंद पडल्या, तर प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.

पूर्वमधील कोकणीपाडा, तानाजी नगर आणि अप्पापाडा या भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनली. स्थानिक रहिवाशांच्या मते, परिसरात सुरू असलेल्या विविध एसआरए पुनर्विकास प्रकल्पांदरम्यान जुनी पावसाळी गटारे आणि जलनिस्सारण व्यवस्था हटविण्यात आल्याने पावसाचे पाणी शेजारच्या चाळी व घरांमध्ये शिरले.

बांधकामातील मातीचा गाळ, सांडपाण्याच्या गटारातील घाण आणि कचरा घराघरांत पोहोचल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे फर्निचर, घरगुती साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे खराब झाली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

दरवर्षी कोट्यवधी रुपयांची प्री-मान्सून कामे करण्यात येत असतानाही पाणी तुंबण्याच्या समस्या कायम असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने सखल भागांतील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

एमएचबी कॉलनीतील घरांमध्ये पाणी

मालाड पश्चिमेतील एमएचबी कॉलनी चाळ क्रमांक ७६ मधील अनेक घरांमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. परिसरातील गटारे तुंबल्यामुळे घरातील पाणी उपसूनही पुन्हा घरात पाणी साचत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT