मुंबई: ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचली पाहिजे. शासकीय आरोग्य सेवा आणि योजनांपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
‘आरोग्य संवाद यात्रा २०२६’ अंतर्गत रविवारी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील विविध आरोग्य संस्थांची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
‘लोकसहभागातून घडवूया माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या संकल्पनेतून सुरू असलेल्या यात्रेदरम्यान आबिटकर यांनी दरेगाव तांडा येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. आरोग्य सेविका व सेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी, आवश्यक औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
वाळकेवाडी येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. दिवाळीनिमित्त कुटुंबाला ‘आनंदाचा शिधा’ देऊन दिलासा दिला. शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
दौऱ्यात दुधड येथील आरोग्य उपकेंद्र, सरसम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. सरसम येथे ईसीजी तपासणी सुविधेची माहिती घेतली. उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला. प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार मिळाले पाहिजेत. रुग्णसेवेत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी खा. नागेश पाटील-आष्टीकर, आ. बाबुराव कदम- कोहळीकर, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तथा संचालक संजय काटकर, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. गोविंद चौधरी, डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.