मुंबई: महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेली असून, मंत्रालयापर्यंत हप्ते पोहोचवले जात आहेत. राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरू आहे, गांजा विकला जातो, हातभट्ट्या व विषारी दारूने थैमान घातले आहे.
या अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारूने 22 निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पुण्यातील प्रकरणाने सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात असल्याने स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी आता कारवाईचे नाटक केले जात असल्याचे सपकाळ म्हणाले.
मराठा आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे मध्यरात्री मनोज जरांगे यांना आरक्षण दिल्याचे जाहीर केले व गुलाल उधळला होता, त्यानंतर आझाद मैदानातील आंदोलनावेळीही गुलाल उधळला, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या दोन्ही आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते, ते जाहीर करावे. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर जातनिहाय जनगणना करावी. त्यातून मराठा समाजासह समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो.