हँकॉक पुलाची कामे रखडली pudhari photo
मुंबई

Hancock bridge project : हँकॉक पुलाची कामे रखडली

पुनर्वसनाची अडचण दूर करून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा : बांगर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ऑगस्ट 2022 मध्ये पुनर्बांधणी पूर्ण करीत हँकॉक पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र पुनर्वसनाचा पेच कायम राहिल्याने इतर कामे रखडली आहेत. ही अडचण तातडीने दूर करून उर्वरित कामांसाठी निविदा प्राधान्याने प्रसिद्ध करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.

मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान हा पूल असून पुलाची पुनर्बांधणी पूर्ण झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच रस्त्यांची कामे अंशत: पूर्ण झाली असून उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूस नवीन रस्ता रेषेनुसार काही वाणिज्यिक आस्थापना बाधित होत आहेत. त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया रखडली आहे.

या पार्श्वूभूमीवर, उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा पुढील आढावा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर आणि पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी 2 डिसेंबर 2025 रोजी घेतला. त्यावेळी बांगर यांनी हे निर्देश दिले.

पुलाच्या पश्चिम बाजूला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या उपकर इमारती आहेत. त्याठिकाणी काही वाणिज्यिक आस्थापना, भाडेकरू आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि म्हाडा प्रशासन यांनी आपापल्या धोरणानुसार त्यावर तोडगा काढावा.

काही भाडेकरू उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यावर न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत. हे स्थगिती आदेश उठविण्यासाठी महानगरपालिकेने वरिष्ठ विधिज्ज्ञांची मदत घ्यावी. आणि न्यायालयीन प्रकरणात योग्य पाठपुरावा करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले.

  • माझगाव आणि डोंगरी यांना जोडणारा हँकॉक उड्डाणपूल जीर्ण झाल्याने मध्य रेल्वेने जानेवारी 2016 मध्ये त्याचे पाडकाम केले.

  • या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने फेब्रुवारी 2020 मध्ये पूर्ण केले

  • ऑगस्ट 2022 मध्ये या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, काही तांत्रिक व न्यायप्रविष्ट बाबींमुळे पुलाची उर्वरित कामे खोळंबली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT