मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये प्रदूषणाचा टक्का वाढला वाढला आहे. प्रमुख स्टेशन्सपैकी तब्बल 16 ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) बुधवारी दोनशेपार गेला.
मुंबईतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये (एक्यूआय) मंगळवारच्या तुलनेत (182-187) फारसा फरक नसला तरी दोनशेहून अधिक एक्यूआय असलेल्या स्टेशन्समध्ये तब्बल 14 अंकांनी वाढ झाली. त्यात सायन येथील सिंधी कॉलनी (290), बोरिवली येथील एमएचबी कॉलनी (289) सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली.
या दोन ठिकाणांसह वडाळा, पश्चिम (220), वांद्रे पश्चिम येथील माउंट मेरी (211) तसेच शिवडी, सुभाष नगर, वांद्रे (पूर्व) आणि स्वस्तिक पार्क, चेंबूर येथेही (204) प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. शिवाजीनगर, गोवंडीसह (196), सायन स्टेशन 1 (193), मालाड पश्चिम (197), सिद्धार्थनगर वरळी (186) परिसरही मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहे.
मुंबई शहर आणि परिसरातील किमान तापमान विशीमध्ये आहे. बुधवारी कमाल तापमान 32 टक्के इतके होते. गुरुवारी (20/31 अंश सेल्सिअस) बुधवारच्या तापमानाची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. मात्र, शुक्रवारपासून (18 अंश सेल्सिअस) किमान तापमान थेट दोन अंशांनी खाली घसरण्याची शक्यता आहे. वीकेंडला पारा 17 अंशांवर येईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.
शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी दिवसभर वातावरण ढगाळ राहील. हवेतील आर्द्रतेमध्ये वाढ कायम असून बुधवारी 88 टक्के आर्द्रतेची नोंद झाली.
प्रदूषणाचे हॉटस्पॉट
ठिकाण एक्यूआय
सिंधी कॉलनी - 290
एमएचबी कॉलनी - 289
वडाळा - 220
माउंट मेरी- 211
शिवडी - 204