MNS Agitation Pudhari
मुंबई

MNS Agitation: हाफकिनच्या खासगीकरणाविरोधात मनसेचे संस्थेबाहेर जोरदार आंदोलन

या आंदोलनात हाफकिनचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: 135 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेच्या संभाव्य खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी आक्रमक भूमिका घेत संस्थेबाहेर जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात हाफकिनचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हाफकिन संस्थेने देश-विदेशात मोठे योगदान दिले असून, पोलिओसारख्या गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 130 हून अधिक देशांना लस पुरवण्याचे काम केले आहे. तसेच धनुर्वात, डांग्या खोकला आणि घटसर्प (त्रिगुणी) लसींचे उत्पादनही येथे केले जाते. मात्र, हे उत्पादन खासगी कंपन्यांकडे देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

कोविड काळात लसनिर्मितीचे काम खासगी क्षेत्राला देण्यात आले, तर हाफकिनसारख्या सक्षम संस्थेला अपेक्षित सरकारी मदत मिळाली नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली. सरकारने व्यावसायिक भागीदारीऐवजी संस्थेला बळकटी देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. या आंदोलनाला काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दर्शवला. यावेळी हाफकिन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांना निवेदन देण्यात आले.

हाफकिन ही विश्वासार्ह आणि जुनी संस्था असून आजपर्यंत कोणत्याही लसीमुळे गंभीर समस्या उद्भवलेली नाही. सरकारने खासगीकरणाचा निर्णय घेण्याऐवजी संस्थेला निधी दिला असता, तर ही वेळ आली नसती.
- गोविंदराव मोहिते, अध्यक्ष, हाफकिन बायोफार्मा संघटना
हाफकिनमध्ये अनेक गोष्टी छुप्या पद्धतीने सुरू आहेत. संस्थेची औषधे बाहेर महागड्या दरात विकण्याचा डाव आहे. फक्त 150 कोटींचा निधी दिल्यास हाफकिन अधिक सक्षमपणे लसींचे उत्पादन करू शकते, मग सरकार निधी का देत नाही?
- मनोज चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT