मुंबई : बुधवारी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका मतदानाच्या पूर्वसंध्येला मुंबईत गुजराती समाज एकगठ्ठा मतदानासाठी एकवटल्याचे चित्र असून बांगलादेशी आणि रोहिंग्यांपासून मुंबई वाचविण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांना मतदान करण्याचे आवाहन मुंबईतील गुजराती भाषिक गृहसंकुलांमधून समाजमाध्यमांद्वारे गुजराती भाषेतून केले जात आहे.
घर-दार,काम-धंदा शांततेत सुरू ठेवण्यासाठी आणि बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांपासून वाचविण्यासाठी या हिंदुत्ववादी पक्षांनाच मतदान करण्याचे आवाहन करणारा हा संदेश बुधवारी गतीने फॉरवर्ड होत होता.
मुंबईची समीकरणे आता पूर्णपणे बदलली आहेत. 1993 मध्ये मुंबईत दंगली झाल्या तेव्हा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने हिंदूंची साथ दिली होती, पण आता ते हयात नाहीत, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पार्टी सत्तेत आली तर भाषेच्या कारणावरून कधीही तुम्हाला रस्त्यावर मारहाण होऊ शकते,तुमचे कामधंदे लुटले जाऊ शकतात, असे या संदेशात म्हटले आहे. याशिवाय तुमच्या घराच्या आजूबाजूला फेरीवाले बनून बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमानांमुळे मुंबईत केरळ किंवा काश्मीर फाईल्ससारखी स्थिती येत्या 2 वर्षांत निर्माण हाऊ शकते, त्यामुळे मुंबईतील गुजराती बांधवांनी सावध राहण्याची गरज असल्याचे मत या संदेशात व्यक्त करण्यात आले आहे.
मुस्लिमांना आश्रय देणाऱ्या राजकीय पक्षांना मुंबईतून गुजराती आणि व्यापाऱ्यांना हाकलून देऊन मुंबईला ड्रग्जचे केंद्र बनवायचे आहे.मतदानाच्या रांगेत दोन तास उभे राहून पाय दुखवून कोण घेणार,असा विचार करून घरी उंधियो खाऊन, चित्रपट पाहून आराम करण्यापेक्षा किंवा सहलीला जाण्यापेक्षा मतदान करा. मतदान हे एके-47 पेक्षा शक्तिशाली शस्त्र आहे. त्यामुळे मतदानाची ताकद ओळखून हिंदूंसाठी लढणाऱ्या पक्षाला मत द्या, असे आवाहन या गुजराती भाषेतील संदेशातून मतदारांना करण्यात आले आहे.