Maharashtra Government Hospital Pudahri
मुंबई

Maharashtra Government Hospital: सरकारी रुग्णालयांत संगणकीकरणाचा फज्जा? डॉक्टरांकडून अजूनही कागदी चिठ्ठीचा वापर

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही. तांत्रिक अडचणी, अपुरी संगणकीय सुविधा आणि विभागांचे अपूर्ण एकत्रीकरणामुळे कागदी कामकाज अद्याप सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील रुग्णसेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेली रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

अनेक शासकीय रुग्णालयांत संगणक, मुद्रक आणि संगणकीय जाळ्याची अपुरी सुविधा, प्रणाली संथ चालणे तसेच तांत्रिक अडचणी कायम असल्याने संगणकीकरणाच्या जोडीला कागदी कारभार आजही सुरूच आहे.

रुग्णालयातील विविध विभागांचे परस्पर एकत्रीकरण अद्याप पूर्ण झालेले नसल्याने एका विभागातून दुसऱ्या विभागात माहिती पाठविताना अडथळे येत आहेत. काही ठिकाणी डॉक्टरांना रुग्णाला एकापेक्षा अधिक विभागांकडे संदर्भित करताना संगणकीय प्रणालीऐवजी कागदी चिठ्ठीचा आधार घ्यावा लागत आहे.

काही रुग्णालयांमध्ये प्रणालीमध्ये एका रुग्णाला एकाच विभागाकडे संदर्भित करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, एकाच वेळी दोन किंवा अधिक विभागांकडे संदर्भ द्यायचा असल्यास अडचणी निर्माण होतात.

परिणामी, अतिरिक्त विभागासाठी डॉक्टरांना कागदी संदर्भचिठ्ठी द्यावी लागत आहे. या तांत्रिक अडचणींचा अभिप्राय रुग्णालयांकडून नियमितपणे राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्राकडे पाठविला जात असून, त्यानुसार प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

भ्रमणध्वनीवरही रुग्ण तपासणी प्रतिमा पाहणे शक्य

क्ष-किरण, संगणकीय छायाचित्रण आणि चुंबकीय अनुनाद प्रतिमांचे एकत्रीकरण याचे रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीसमोरील मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या तपासण्यांमधून मिळणाऱ्या मोठ्या आकाराच्या प्रतिमा सुरक्षितपणे साठविण्यासाठी अतिरिक्त माहिती-साठवण क्षमता, सक्षम संगणकीय सर्व्हर व वेगवान संगणकीय जाळ्याची आवश्यकता आहे.

प्रतिमा संग्रहण व संपर्क व्यवस्था जोडण्याचे काम सुरू असून, त्याची तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. आवश्यक उपकरणांची खरेदी व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना रुग्णालयातील कोणत्याही विभागातून व भ्रमणध्वनीवरूनही रुग्णांच्या तपासणीच्या प्रतिमा पाहता येणार आहेत.

तीन महिन्यांत सुधारणा करण्याचा दावा

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या संगणकीकृत प्रणालीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक अडचणी आणि अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू राहते.

रुग्णालयांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि तक्रारींचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. पुढील तीन महिन्यांत बहुतांश महत्त्वाच्या विभागांचे एकत्रीकरण पूर्ण करून प्रणाली अधिक प्रभावी आणि सुरळीत करण्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, तोपर्यंत संगणकीकरणासोबत कागदी कामकाजही सुरू राहणार असल्याने ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कधी कार्यान्वित होते, याकडे रुग्णांसह रुग्णालय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

औषध वितरणातही कागदी चिठ्ठीचा वापर

औषधालय विभागात आवश्यक संख्येने संगणक उपलब्ध नसल्याने औषध वितरणाची प्रक्रियाही अद्याप पूर्णपणे संगणकीकृत झालेली नाही.

बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरांनी लिहिलेली औषधांची छापील चिठ्ठी रुग्णाला दिली जाते. ही चिठ्ठी औषधालयात दाखविल्यानंतर त्यानुसार औषधे दिली जात आहेत. त्यामुळे रुग्णालयात संगणकीय प्रणाली सुरू झाली असली, तरी प्रत्यक्ष रुग्णसेवेत अनेक ठिकाणी जुनी कागदी पद्धत अद्याप हद्दपार झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT