Government Dental College Mumbai pudhari photo
मुंबई

Government Dental College Mumbai : उद्घाटनाआधीच कोट्यवधींचे सरकारी ऑडिटोरियम पाण्यात!

पहिल्याच पावसात दंत महाविद्यालयाच्या बेसमेंटमध्ये शिरले पाणी; मंत्र्यांचा उद्घाटन सोहळा रद्द

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उद्घाटनाचा नारळ फुटण्यापूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सरकारी दंत महाविद्यालयाच्या नव्या ऑडिटोरियमची पोलखोल झाली. सीएसएमटी येथील शासकीय दंत महाविद्यालयाच्या बेसमेंटमध्ये उभारलेल्या या सभागृहात पहिल्याच मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने गुरुवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणारा उद्घाटन सोहळा ऐनवेळी रद्द करण्यात आला. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुमारे ४९० आसनक्षमतेच्या या नव्या ऑडिटोरियममध्ये मार्गिका, कँटीन आणि मुख्य सभागृहात तब्बल एक फूट पाणी साचले. सकाळपासून कर्मचारी आणि पंपांच्या सहाय्याने पाणी उपसण्याची धावपळ सुरू होती. सायंकाळी पाचच्या सुमारास पाणी बाहेर काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकल्पावर सुमारे आठ ते नऊ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सात वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र उद्घाटनापूर्वीच पहिल्याच पावसात ऑडिटोरियम जलमय झाल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या इमारतीचा ताबा अद्याप रुग्णालय प्रशासनाकडे देण्यात आलेला नव्हता. उद्घाटनानंतर तो हस्तांतरित होणार होता. मात्र त्याआधीच झालेल्या या प्रकारामुळे संबंधित यंत्रणांची चांगलीच फजिती झाली आहे. उद्घाटनाच्या आदल्या दिवशी पीडब्ल्यूडीने तांत्रिक त्रुटी निदर्शनास आणून दिल्याची माहिती समोर आली आहे. पावसामुळे विद्युत सुरक्षेचा धोका टाळण्यासाठी उद्घाटन पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

  • विशेष म्हणजे, या परिसरातील बेसमेंटमध्ये पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचते, अशी माहिती असतानाही त्याच ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून ऑडिटोरियम उभारण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT