Govandi Pollution Case Pudhari
मुंबई

Govandi Pollution Case: गोवंडीकरांच्या १७ वर्षांच्या न्यायालयीन लढाईला अखेर यश! एसएमएस कंपनीचा प्रकल्प स्थंलातरित

जुलै २०२७ पर्यंत प्रदूषणाचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश साबळे

मुंबई: गोवंडीतील प्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या १७ वर्षांच्या संघर्षाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या एसएमएस कंपनीचा प्रकल्प गोवंडीतून स्थलांतरित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

गोवंडी परिसरात २००९ पासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या. या प्रश्नावर अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलने, धरणे आणि पाठपुरावा केला.

जनहित याचिकेमुळे स्थलांतराचा मुद्दा न्यायालयात पाेहोचला

या प्रश्नावर गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष ॲड. शेख फैयाज आलम यांनी न्यायालयीन लढा उभारला. यापूर्वी मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या आलम यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्यांसाठी वकिलीचा मार्ग स्वीकारला. संस्थेच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे एसएमएस कंपनीच्या स्थलांतराचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला.

आंदोलनात अनेक पक्षांची, नेत्यांचीही साथ

आमदार अबू आझमी, आदित्य ठाकरे, राहुल शेवाळे, रईस शेख, जमीर कुरेशी आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नावर वेगवेगळ्या टप्प्यांवर भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची प्रतीक्षा नागरिकांना होती.

स्थलांतराची प्रक्रिया सुरू; पुढील मुदतीकडे लक्ष

एसएमएस कंपनीचा प्रकल्प जांभिवली एमआयडीसी येथे स्थलांतरित करण्यासंदर्भातील काम ५० टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. जुलै २०२७ पर्यंत गोवंडीतील प्रदूषणाचा प्रश्न कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा

गोवंडीकरांचा प्रदूषणाविरोधातील लढा आता न्यायालयीन आदेशापर्यंत पोहोचला असला, तरी प्रत्यक्ष स्थलांतर आणि त्यानंतर प्रदूषणात होणारी घट महत्त्वाची ठरणार आहे. न्यायालयीन आदेशाची वेळेत अंमलबजावणी झाल्यास अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आता महापालिका प्रशासन आणि संबंधित कंपनी पुढील कार्यवाही किती वेगाने पूर्ण करतात, याकडे गोवंडीकरांचे लक्ष लागले आहे.

गोवंडी येथील जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारी एसएमएस कंपनी मे -२०२६ मध्ये अंबरनाथ येथील एमआयडीसी याठिकाणी स्थलांरित होणार आहे. यासाठीची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. मात्र कंपनीला दिलेल्या भूखंडावर काय उभारायचे आहे. ते अद्याप ठरले नाही.
-किरण दिघावकर, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT