Human Trafficking Racket Pudhari
मुंबई

Human Trafficking Racket: गोवंडीत अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी बनवून वेश्या व्यवसाय; मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय

गुन्हे शाखेकडून तृतीयपंथी गुरूला अटक

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला: अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना तृतीयपंथी करत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय केला जात असल्याचा प्रकार गोवंडी येथे समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा परिमंडळ सहाने यातील मुख्य आरोपीला नवीमुंबई परिसरातून अटक केली असून यामध्ये एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

गोवंडी परिसरात राहणारा एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा काही दिवसांपूर्वी त्याच्या राहत्या घरातून अचानक गायब झाला होता. याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी गोवंडीच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तत्काळ तपास सुरू केला. तपासात याच परिसरातील एका तृतीयपंथी टोळीने या मुलाचे अपहरण करून त्याला देखील तृतीयपंथी बनवल्याचे समोर आले. तसेच त्याला लोकल ट्रेन तसेच विविध ठिकाणी पैसे मागण्यासाठी पाठवत असल्याचे देखील समोर आले.

धक्कादायक बाब म्हणजे या मुलाला महिलांचे कपडे घालून त्याच्याकडून वेश्या व्यवसाय देखील करून घेतला जात होता. त्यानुसार शिवाजी नगर पोलिसांनी यामध्ये हजरा नावाच्या एका आरोपीला काही दिवसांपूर्वी अटक करत या मुलाची सुटका केली होती. मात्र यातील मुख्य आरोपी बाबू खान उर्फ बाबू हिजडा (30) हा अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार होता.

शिवाजी नगर पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा परिमंडळ सहाकडून देखील या आरोपीचा शोध सुरू होता. याच दरम्यान शनिवारी हा आरोपी वाशी नवीमुंबई येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी त्याठिकाणी जाऊन सापळा रचला होता. मात्र याची कुणकुण आरोपीला लागताच त्याने तिथून पळ काढला. यावेळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी देखील त्याचा पाठलाग करत त्याला चेंबूरच्या पांजरापोळ सर्कल येथून ताब्यात घेतले.

तपासात या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून वर्षभरापूर्वी याच आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी देखील अटक केली होती. बांगलादेशी तरुणांना मुंबईत आणून त्यांना तृतीयपंथी केल्याचा गुन्हा या आरोपीवर आहे. याशिवाय देवनार, कुर्ला, शिवाजी नगर आणि नवीमुंबई असे एकूण पाच गुन्हे या आरोपीवर दाखल आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेने या आरोपीला पुढील चौकशीसाठी शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून शिवाजी नगर पोलीस यामध्ये अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT