गोरेगाव : पूनम पाटगावे
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींच्या सदनिकांच्या तपासणी सुरू आहे. या दरम्यान, दोन दिवसांत दोन गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावरून लिप्ट बेसमेंटला आदळली तर एका इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून प्लास्टरचा मोठा भाग कोसळला. यामुळे ताबा घेण्यापूर्वीच रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
एल विंगच्या सदनिकांची तपासणी सुरू असताना सोमवारी (13 ऑक्टोबर) एफ विंगच्या 11 व्या मजल्यावरून मोठा प्लास्टरचा भाग कोसळला. सुदैवाने, घटनास्थळी कोणी उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तर रविवारी (12 ऑक्टोबर) के विंगची लिफ्ट दुसऱ्या मजल्यावरून थेट बेसमेंटला आदळली आणि नंतर पोडियमवर (पहिल्या मजल्यावर) येऊन थांबली. लिफ्टमध्ये त्यावेळी सहा सभासद होते. सर्व सुखरूप आहेत. मात्र, या दोन घटना व तपासणीत आढळलेल्या त्रुटींमुळे या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सोसायटीच्या सदस्यांनी यापूर्वीही कामाबाबत तक्रारी दिल्या असताना त्यात सुधारणा न झाल्याने तीव्र नाराजीही व्यक्त होत आहे.
तोपर्यंत ताबा घेणार नाही
सध्या सदनिकांची पाहणी सुरू असून सर्व रूम एकसमान नसून मोजणीत तफावत आहे. कामाच्या दर्जाचा प्रश्नही आहे. त्यामुळे जोपर्यंत योग्य करारनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही ताबा घेणार नाही, असा पवित्रा सदनिकाधारकांनी घेतला आहे.
आक्षेप काय?
निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले आहे. हलक्या प्रतीचे साहित्य वापरले आहे.सदनिकांचा फ्लोअर प्लॅन डिझाइनप्रमाणे केलेला नाही.अनेक सदनिकांमध्ये जंगली लाकडी दरवाजे लावले असून, त्यांना आताच वाळवी लागल्याचे दिसून येत आहे. किचन प्लॅटफॉर्ममध्ये अनियमितता: काही सदनिकांमधील किचन प्लॅटफॉर्मची साईज वेगवेगळी आहे.
वारंवार अपघात होत आहेत. रहिवाशांचा जीव धोक्यात असतानाही म्हाडा अजूनही कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही अनेक वर्षांपासून आमच्या घरांसाठी संघर्ष करत आहोत आणि आता जेव्हा घर मिळणार याचा आनंद असताना सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हाडाने तातडीने यात लक्ष घालून उत्कृष्ट दर्जाचे काम करून द्यावे आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई करावी.समीर नाईक, लाभार्थी सदनिकाधारक