मुंबई: गोरेगाव येथील एका व्यावसायिकाला कारवाईची धमकी देऊन खंडणी वसुलीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डच्या एका तोतया फिल्ड अधिकार्याला वनराई पोलिसांनी अटक केली.
सचिन महाडिक ऊर्फ स्वराज प्रदीप घोसाळकर असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते गोरेगाव परिसरात राहतात. गोरेगाव परिसरात त्यांची एक खाजगी कंपनी आहे. २५ ऑगस्टला त्यांच्या कार्यालयात सचिन गायकवाड आला होता.
त्याने तो महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डचा अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांना एक व्हिझिटिंग कार्ड दिले होते. त्याने त्यांना त्यांच्या कंपनीकडून होणार्या प्रदुषणाबाबत काही तक्रारी असल्याने त्यांच्याविरुद्ध चुकीचा रिपोर्ट बनविणार असल्याची धमकी दिली.
हा रिपोर्ट न बनविण्यासाठी त्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर कारवाईला तयार रहा असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला दहा हजार रुपये दिले होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी सचिन महाडिकविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डमध्ये सचिन महाडिक नावाचा कोणीही अधिकारी नसल्याचे उघडकीस आले. त्याच रात्री सचिनने त्यांना कॉल केला होता.
त्यांना साहेबांना २५ हजार रुपये द्यावे लागतील. तसेच तीन वर्षांच्या क्लिअरन्ससाठी त्यांना गुगल पेद्वारे बारा हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यांनी त्याला कार्यालयात येऊन पैसे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
दुसर्या दिवशी सचिन तिथे आला होता. यावेळी त्यांनी वनराई पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सचिन महाडिक ऊर्फ स्वराज घोसाळकर याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याचा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डशी काहीही संबंध नाही, केवळ पैसे उकाळण्यासाठी तो तिथे आला होता. पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्याने पुन्हा त्यांना कॉल करुन आणखीन पैशांची मागणी केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्याायलयात हजर करण्यात आले होते. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.