जुळ्या बोगद्यांचे काम लवकरच सुरू  pudhari photo
मुंबई

Goregaon twin tunnel project : जुळ्या बोगद्यांचे काम लवकरच सुरू

मुलुंड-गोरेगाव लिंक रोड प्रकल्पाचे काम आता निर्णायक टप्प्यावर

पुढारी वृत्तसेवा

मुलुंड : मुलुंड-गोरेगाव लिंक रोड प्रकल्पाचे काम आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणारा बोगदा खोदण्याचे काम लवकरच सुरू होत आहे. या मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर तर होईलच, पण इंधन व वेळेचीही बचत होणार आहे.

मुंबईच्या पश्चिमेकडील गोरेगाव आणि पूर्वेकडील मुलुंड या मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा प्रकल्प महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या रस्त्यामुळे प्रवासाचे अंतर 8.80 किलोमीटरने कमी होणार आहे. सध्या या दोन उपनगरांदरम्यान प्रवास करण्यासाठी जोगेश्वरी - विक्रोळी जोड रस्ता (जेव्हीएलआर) हा एकमेव प्रमुख पर्याय आहे.

या प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात 5.3 किलोमीटर लांबीच्या तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या बोगद्यासाठी आवश्यक असलेल्या लॉन्चिंग शाफ्टचे खोदकाम सध्या वेगाने सुरू असून हा शाफ्ट साधारणपणे 200 मीटर लांब, 50 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल आहे. आतापर्यंत 23 मीटर खोलीपर्यंतचे खोदकाम पूर्ण झाले असून उर्वरित 7 मीटरचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दररोज साधारण 1400 ते 1500 क्युबिक मीटर दगड आणि माती 120 वाहनांद्वारे बाहेर काढली जात आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रकल्पासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे (टीबीएम) वापरली जाणार आहेत. यापैकी एका यंत्राचे सर्व भाग उपलब्ध झाले असून, दुसऱ्या यंत्राचे उर्वरित भाग 22 जानेवारीपर्यंत कामाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. 10 मार्चपर्यंत ही अवाढव्य यंत्रे शाफ्टमध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर जून 2026 पासून प्रत्यक्ष बोगदा खोदकामाला सुरुवात करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. 5.3 किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे होणार आहेत.

  • या प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास 14.42 मीटर इतका प्रचंड असून त्यामध्ये तीन मार्गिका असतील. कामाचा दर्जा आणि वेग कायम राखत निर्धारित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT