मुंबई ः गोरेगाव येथील एका बांधकाम साईट इमारतीच्या अठराव्या मजल्यावरुन पडून सौम्य रंजन बेहरा (29) कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना 6 मे रोजी रात्री सव्वाबारा वा. गोरेगाव येथील एस. व्ही रोडवरील अग्रवाल फ्लोरेन्स या बांधकाम साईटवर घडली. या घटनेनंतर आठ दिवसांनी गोरेगाव पोलिसांनी विकासक अखिल अग्रवाल आणि कॉन्ट्रक्टर जितेंद्र दास अशा दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे.
कामगाराच्या राहण्याची योग्य ती सुरक्षा न घेतल्याने ही दुघर्टना घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कुणाल निजाई हे गोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. 6 मेला ते त्यांच्या सहकाऱ्यासोबत परिसरात गस्त घालत होते.
यावेळी त्यांना कंट्रोल रुममधून अग्रवाल फ्लोरेन्स या बांधकाम साईटवरुन एक कामगार पडला असून त्याला उपचारासाठी जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समजली होती.
चौकशीत सौम्या हा 29 वर्षांचा कामगार मूळचा ओरिसाचा रहिवाशी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो अग्रवाल फ्लोरेन्स या बांधकाम साईटवर काम करत होता. दिवसा काम करुन तो इमारतीच्या अठराव्या मजल्यावर रहात होता.
6 मेला रात्री सव्वाबारा वाजता अठराव्या मजल्यावर झोपला होता. यावेळी त्याचा तोल गेला आणि अठराव्या मजल्यावरुन खाली पडला. हा प्रकार तिथे उपस्थित इतर कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
सुरक्षेच्या साधनांअभावी कामगाराचा नाहक बळी
या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. यावेळी तिथे कामगाराच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्यात आली नव्हती. कामगारांची राहण्याची योग्य सोय करण्यात आली नव्हती. सुरक्षित उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडली. त्यात एका कामगाराचा नाहक बळी गेला होता. बांधकाम साईटच्या कॉन्ट्रक्टर जितेंद्र दास आणि विकासक अखिल अग्रवाल अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.