Doctors Pudhari
मुंबई

Gorai medical crisis: सुविधांअभावी गोराईमध्ये वैद्यकीय सेवा व्हेंटिलेटरवर; 100 वर्षीय दवाखान्यामध्ये एकही बेड उपलब्ध नाही

आपत्कालीन कक्षासह ऑक्सिजनचीही वानवा

पुढारी वृत्तसेवा

राजेश सावंत

मुंबई: मुंबई शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे गोराई गाव वैद्यकीय सेवा सुविधांपासून वंचित राहिले आहे. याकडे मुंबई महापालिकेचे लक्ष वेधूनही गांभीर्याने घेण्यात आले नाही. एखाद्या माणसाला हृदयविकाराचा झटका आला तरी, त्याला स्थिरस्थावर करण्याकरिता आपत्कालीन कक्षासह ऑक्सिजनची व्यवस्था नाही. अस्तित्वात असलेल्या 100 वर्षीय दवाखान्यामध्ये एक बेडही उपलब्ध नाही.

गोराई गाव हा पॅगोडा, एस्सेल वर्ल्ड, वॉटर किंग्डम, प्रशस्त चौपाटी, निसर्गरम्य परिसर व अन्य पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. पण मुंबईत असलेल्या या गावाकडे मुंबई महापालिकेचे कायमच दुर्लक्ष झाले आहे. सुमारे अडीच ते तीन हजार लोक वस्ती असलेल्या या गावात वैद्यकीय सेवा सुविधांची बोंब आहे.

गोराई गावात 100 वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन दवाखाना आहे. येथे 24 तास डॉक्टर उपलब्ध नसतात. अपघात झाल्यास रिक्षाने कांदिवली येथील पालिकेच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी न्यावे लागते. गेल्या वर्षभरात 13 तरुण मुलांच्या अपघाती मृत्युची नोंदी गोराई पोलीस ठाण्यात नोंदवल्या गेल्या आहेत.

गावातील गरोदर महिलांसाठी प्रसुती कक्षाची व्यवस्थाही नाही. महिलेला प्रसूती वेदना चालू झाल्यास तिला 20 कि.मी. दूर रिक्षाने मीरा-भाईंदर येथील महापालिका रुग्णालयात न्यावे लागते. किंवा बोटीने खाडीच्या पलीकडे 30 कीमी कांदिवली शताब्दी किंवा खाजगी हॉस्पिटल न्यावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT