Gorai mangrove park Pudhari
मुंबई

Gorai mangrove park: गोराई कांदळवन उद्यान वर्षभरापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; वर्षभरापासून तारीख पे तारीख..

स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

पुढारी वृत्तसेवा

कांदिवली: महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळ वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेले गोराई कांदळवन उद्यान (गोराई मँग्रोव्ह पार्क) गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे तयार असूनही प्रशासकीय कारणांमुळे त्याचे उद्घाटन लांबणीवर पडत आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी लागलेली असताना हे कांदळवन उद्यान बंद असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

बोरीवली पश्चिमेला गोराई जेट्टीजवळच खाडीला लागून 33.43 कोटी रुपये खर्चून भव्य गोराई कांदळवन उद्यान उभारण्यात आले आहे. पर्यावरणीयदृष्ट्या हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये उद्यानाचे काम पूर्ण झाले आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले हे उद्यान 6 महिने उलटूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. 1 मे 2025 पासून उद्यानाच्या उद्घाटनाच्या तारखा सतत बदलत असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

उद्यान खुले झाल्यानंतर पर्यटकांना मँग्रोव्ह परिसंस्थेतून उभारलेल्या बोर्डवॉकवरून चालत निसर्गाचा अनुभव घेता येईल. तसेच किनारी जैवविविधतेबाबत माहिती मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून हा प्रकल्प लवकरात लवकर नागरिकांसाठी सुरू करण्याची विनंती केली होती.

या कांदळवन उद्यानात पक्षीनिरीक्षणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून पक्ष्यांच्या विविध प्रजाती पाहण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे.

दरम्यान, गोराईतील या कांदळवन उद्यानाचे सर्व काम पूर्ण झाले असून एप्रिलमध्ये ते नागरिकांसाठी खुले केले जाईल, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र मे सुरु झाला तरी उद्यानाचे उद्घाटन अद्याप झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT