मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी माफी मागण्यास भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी ठामपणे नकार दिला आहे. पडळकर यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातून टीका होत आहे. पण या त्यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोन करुन पडळकर यांना समज दिली होती. पण पडळकर यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. यामध्ये त्यांनी जयंत पाटील यांची माफी मागण्यास ठामपणे नकार दिला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली.
जत येथे केले हाेते वादग्रस्त वक्तव्य
जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा माणूस आपण किती बिनडोक आहे, हे सिद्ध करतोय. त्याचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करणे एवढेच. तो एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी जाणीवपूर्वक बदनामी करत आहे, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. तसेच त्यांनी यावेळी आमदार जयंत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती समज
"गोपीचंद पडळकर यांच वक्तव्य योग्य नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल बोलणं चुकीच आहे. याबाबत गोपीचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. शरद पवारांचा फोन आला होता, त्यांनाही सांगितलं आहे. अशा प्रकारच्या वक्तव्याच समर्थन करणार नाही.
त्यावेळी पवारांनी असा फोन केला का ?
याबाबत पत्रकारांनी छेडले असता पडळकर म्हणाले की ‘ जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्रींवर खालच्या पातळीवर टिका झाली त्यावेळी पवारांनी असा फोन केला का? त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यावर एआय जनरेटेड माध्यमातून घाणेरडी टिका करण्यात आली होती. त्यावेळी पवारांनी मोदीजींना फोन करुन आक्षेप नोंदवला होता का? असा प्रतिप्रश्न केला? माफी मागायचा काय विषय येत नाही असे ठामपणे सांगितले.
पडळकरांविरोधात शरद पवार गट आक्रमक
दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. अनेक जिल्ह्यांमध्येही निषेध व्यक्त होत आहे.
त्यांचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही : चंद्रशेखर बावनकुळे
गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य आम्हाला मान्य नाही आमचे जे संस्कार संस्कृती आहे ते कुणाही आई-वडिलांच्या बद्दल बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. आई-वडिलांचे नाव घेऊन त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तिमत्त्वावर टीका करणे किंवा आई-वडिलांच्या उल्लेख हा सार्वजनिक करणे हे काही योग्य नाही गोपीचंद पडळकर यांच्याशी मी चर्चा करणार आहे. यानंतर मात्र गोपीचंद पडळकर असे वक्तव्य करणार नाही याकरिता आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.