Gopichand Padalkar Jitendra Awhad Controversy Vidhan Bhavan
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाने गुरुवारी टोक गाठले. विधान भवनातील लॉबीमध्येच पडळकर- आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरश: मारामारी झाली. शिवीगाळ आणि मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली असून लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात अशा प्रकारची घटना घडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
गुरुवारी संध्याकाळी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीमध्ये आमनेसामने आले. आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. लॉबीत उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी हा वाद सोडवला. वाद नेमका कसा सुरू झाला, नेमकं काय घडलं हे अद्याप समजू शकलेले नाही.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पवार हे देखील काही वेळाने तिथे पोहोचले. आव्हाडांच्या संतप्त कार्यकर्त्यांनीही जयंत पाटील यांच्याकडेही तक्रार केली. या पडळकरांना मारणार, असं कार्यकर्ते जयंत पाटील यांना सांगत होते. शेवटी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी झाली होती वादाला सुरूवात
डाॅ.जितेंद्र आव्हाड हे बुधवारी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आव्हाड समर्थकांनी केला. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ केली. त्यावरून विधिमंडळाच्या प्रांगणात वाद झाला होता.
राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भेटीला पोहोचले. पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर कार्यवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
पडळकरांना बावनकुळेंनी कॅबिनमध्ये बोलवून घेतलं
हाणामारीची माहिती मिळताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तत्काळ आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनमध्ये बोलवून घेतलं. यात बैठकीत गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार केल्याचे समजते.