

Artificial Flowers Ban in Maharashtra
कोरेगाव : कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते. या कृत्रिम फुलांमुळे आरोग्य, शेतकरी अर्थकारण आणि पर्यावरणांवर परिणाम होत असून या फुलाची निर्मिती, आयातीवर सरकारने बंदी घालावी, अशी आ. महेश शिंदे यांनी केलेली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा झाली असून कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बुधवारी जाहीर केले.
गेल्या काही काळापासून प्लास्टिकच्या फुलांची आयात आणि निर्मिती वाढली आहे. त्यामुळे फुलशेती धोक्यात आली आहे. कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते. या कृत्रिम फुलांमुळे आरोग्य, शेतकरी अर्थकारण आणि पर्यावरणांवर परिणाम होत आहे. या फुलाची निर्मिती, आयातीवर सरकारने बंदी घालावी, अशी लक्षवेधी आ. महेश शिंदे यांनी विधानसभेत मांडली होती. या विषयात राज्यभरात पडसाद उमटले. सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून शेतकरी मंगळवारी मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाले.
त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा झाली असून त्यांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून त्या माध्यमातून राज्य सरकारने याबाबत निर्णय जाहीर करावा, अशी मागणी करत आ. शिंदे यांनी बुधवारी पुन्हा एकदा हा विषय सभागृहात उपस्थित केला होता.
मंत्री भरत गोगावले यांनी या विषयावर आ. महेश शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्य सरकार कृत्रिम फुलांवर बंदी घालत आहे, असे त्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकार या आठवड्यात याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करेल, असे त्यांनी सांगितले.
आ. महेश शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात पर्यावरणाचे रक्षण करत असताना वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. कृत्रिम फुलाबाबत त्यांनी विधिमंडळात आवाज उठवून सरकारचे अत्यंत महत्त्वाचे विषयाकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील फुल शेती करणार्या शेतकर्यांशी निगडित जीवन मरणाच्या या प्रश्नाकडे त्यांनी सभागृहाचे आणि संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. जागतिक पातळीवर या विषयाची दखल घेतली गेली, त्यामुळे राज्य सरकारने या विषयात गांभीर्य दाखवले. आम्ही शेतकरी मुंबईत दाखल होत आहोत, हे समजताच आ. महेश शिंदे यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा करून आम्हाला न्याय मिळवून दिला आहे. ग्रामीण भागातील फुल शेतीला दिलासा देणारा हा निर्णय असून शेतकरी हित जोपासणारा आमदार आम्हाला लाभला आहे, अशी भावना सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांनी व्यक्त केली.