नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला जावा. तसेच सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांचे स्मारक उभारले जावे, अशी मागणी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी सोमवारी (दि.८) लोकसभेत शून्य प्रहरात केली. साहित्याच्या क्षेत्रातील अण्णाभाऊंचे योगदान कधीही विसरता येणार नाही. अनेक अजरामर साहित्याकृतीच्या माध्यमातून त्यांनी जनमनाला भुरळ घातली होती. या पार्श्वभूमीवर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, असे माने म्हणाले.
खासदार माने म्हणाले की,सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावात लोकशाहीर साठे यांचा जन्म १९२० साली मातंग समाजातील गरीब कुटूंबात झाला.केवळ दीड दिवसाची शाळा शिकलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महान साहित्यिक बनले.त्यांनी १३ लोकनाट्ये,३ नाटके,१३ कथासंग्रह,३५ कादंबऱ्या, १ शाहीरी पुस्तक, १५ पोवाडे,१ प्रवास वर्णन, ७ चित्रपट असे प्रतिभाशाली साहित्य निर्माण केले.त्यांच्या जीवनावर चित्रपट बनला आहे. त्यांच्या फकीरा कादंबरीला राष्ट्रीय मानांकन मिळाले. या कांदबरीचे अनुवादन २७ विविध भाषेमध्ये करण्याचा बहुमान मिळाला आहे. लोकशाहीर साठे यांनी शोषित,पीडित,कष्टकरी,दिन दुबळ्यावरील साहित्यातून जागतिक स्तरावर प्रश्न मांडले.
मार्क्सवादी विचारसरणीचा पोवाडा गायल्याने त्यांना प्रभावशाली साहित्यिक म्हणून लोकशाहीर साठे यांना रशिया सरकारने निमंत्रीत केले.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर साठे यांचे मोठे योगदान आहे.असा महान साहित्यिक राज्य सरकारच्या तुटपुंज्या शाहीरी मानधनावर जगत होते.शेवटच्या जीवनात आर्थिक परिस्थिती खालावत गेल्याने लोकशाहीर पुन्हा दारिद्रयाचे चटके सोसत सन १९६० साली काळाच्या पडद्यावर गेले. देश आणि महाराष्ट्र राज्याच्या क्रांतिकारक चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या दलित, विद्रोही, सत्याग्रही साहित्यिक लोकशाहीर साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करावा, अशी मागणी माने केली.
हेही वाचलंत का ?