मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांना घर लागल्याचे संदेश प्राप्त होत आहेत. काही वेळा त्यांना घर लागल्याचे फोनद्वारे कळवले जात आहे. त्यांच्याकडून एक ओटीपी घेऊन त्यांची संमती निश्चित केली जात आहे. यामुळे मुंबईत घर मिळण्याची संधी गिरणी कामगारांकडून हिरावली जाण्याचा धोका आहे.
गिरणी कामगारांना राज्य शासनाकडून म्हाडामार्फत घरे दिली जात आहेत. यासाठी शेलू व वांगणी येथे दोन मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. हे प्रकल्प उभारणार्या विकासकांकडून गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांशी संपर्क साधला जात आहे. गिरणी कामगारांच्या एका संघटनेचा या प्रकल्पांना पाठिंबा असला तरी अन्य एक संघटना मुंबईत घर मिळण्यावर ठाम आहे.
गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संघटना गिरणी कामगारांची दिशाभूल करत आहेत. वांगणी आणि शेलू या ठिकाणी घरांसाठी काही संघटना स्वतःहून गिरणी कामगारांना फोन करतात. त्यांना आमिष दाखवतात आणि त्यांच्याकडून सहमतीपत्र घेतात. मी म्हाडा कार्यालयातून बोलत आहे. तुम्हाला वांगणीला किंवा शेलूला घर लागले आहे किंवा तुम्हाला मुंबईत घर लागले आहे, असे खोटे सांगतात. गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत असल्यामुळे भारावून जातात आणि आपल्या सहमतीसाठी ओटीपी देतात. यामुळे त्यांचे शेलू किंवा वांगणी येथील घर निश्चित होते व मुंबईत घर मिळण्याचा गिरणी कामगारांचा अधिकार हिरावला जातो. त्यामुळे अशा प्रकारे वांगणी व शेलू येथील घरांना संमती देऊ नये, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.