अनेक वर्षे लढा दिल्यानंतर काही गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळाली खरी पण आता त्यांच्या इमारतींत असणाऱ्या संक्रमण गाळ्यांमुळे गिरणी कामगार अडचणीत सापडले आहेत. शिवडीच्या डॉन मिल सोसायटीत गिरणी कामगारांच्या घरांपेक्षा संक्रमण गाळेच अधिक असल्याने त्यांना गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करणे अशक्य झाले आहे.
शिवडीच्या 'स्वान मिल डॉन मिल म्हाडा संकुला'त दोन विंग आहेत. ए विंगमधील सर्व ३८६ घरे गिरणी कामगारांची आहेत. त्यामुळे त्यांना सोसायटी बनवणे शक्य झाले. याउलट बी विंगमधील २४० गाळे संक्रमण शिबिराचे आहेत. गिरणी कामगारांची घरे केवळ ९६ आहेत. गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करण्यासाठी किमान ६० ते ६५ टक्के सदनिकाधारकांकडे मालकी हक्क असणे आवश्यक आहे; मात्र बी विंगमध्ये मालकी हक्क असलेले गिरणी कामगार अल्पसंख्याक झाल्याने त्यांना गृहनिर्माण संस्थेची नोंदणी करता आलेली नाही. त्यांना २०१३ साली घरांचा ताबा देण्यात आला होता.
म्हाडाने डॉन मिलची सोडत २८ जुलै २०१२ रोजी काढली होती. ज्या गिरण्यांची सोडत निघाली आहे त्यांच्या इमारतीमध्ये ७० टक्के गिरणी कामगार आणि ३० टक्के संक्रमण शिबीर असणे अपेक्षित आहे. डॉन मिलच्या बाबतीत मात्र उलट परिस्थिती आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थेची नोंदणी शक्य नाही आणि संस्था नोंदणीकृत नसल्याने संक्रमण शिबिरांवर नियंत्रण ठेवणेही कठीण झाले आहे. गिरणी कामगारांना सोसायटीसाठी कोणतेही नियम लागू करता येत नाहीत. देखभाल शुल्क मात्र नियमितपणे भरावे लागते. म्हाडाकडे वारंवार पाठपुरावा करूनही या समस्येवर तोडगा निघालेला नाही.
सोसायटीचे मुख्य प्रवर्तक आनंदराव मोरे यांनी 'दै. पुढारी'ला दिलेल्या माहितीनुसार, संक्रमण शिबिरातील रहिवासी खिडकीतून कचरा, लहान मुलांची विष्ठा बाहेर टाकतात. त्यामुळे इमारतीच्या आवारात सर्वत्र घाण पसरली आहे. उद्वाहनाच्या दरवाज्यात काही लोक भुंकतात. सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकतात. कचरा करतात, दारू पितात. सोसायटी तयार न झाल्याने त्यांच्यावर कारवाईही करता येत नाही.
सोसायटीच्या संपूर्ण देखभाल शुल्काचा भार गिरणी कामगारांवर पडत आहे. ९६ जणांचे मिळून २ लाख ८५ हजार देखभाल शुल्क दर महिन्याला भरले जाते.म्हाडाकडून प्रतिमहिना २ लाख १० हजार रुपये खर्च सोसायटीवर केला जातो. यात झाडूवाला, पाणीवाला, सुरक्षारक्षक यांचा समावेश आहे. सुरक्षारक्षक केवळ सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंतच असतो. रात्रभर सोसायटीला सुरक्षारक्षक नसतो. उद्वाहन बिघडते. खरेतर स्वान मिलने सोसायटी बनवताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यांचे संक्रमण गाळे आमच्या इमारतीत टाकण्यात आले आहेत तर आमचे काही गिरणी कामगार त्यांच्या इमारतीत आहेत. म्हाडा उपाध्यक्षांना पत्र देऊनही त्यांनी बैठक घेतली नाही.
आनंदराव मोरे, मुख्य प्रवर्तक, डॉन मिल सोसायटी (नियोजित)