Harshvardhan Sapkal Targets BJP Pudhari Photo
मुंबई

Harshvardhan Sapkal Targets BJP| महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा: सपकाळ

देशविरोधी भूमिका घेणाऱ्या गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी अमृतसर येथे ऑपरेशन ब्ल्यू स्टारसंदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे आहे. देशाच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशविरोधी भूमिका घेणाऱ्या गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नव्हती, तर भारताचे तुकडे करण्याचे कारस्थान रचणाऱ्या सशस्त्र खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यदलाने राबविलेली अत्यंत कठीण मोहीम होती.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही देशाच्या एकता व अखंडतेला प्राधान्य देत हा कठोर निर्णय घेतला होता. त्यानंतर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. या मोहिमेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य करून त्यांची हत्या केली, असे सपकाळ म्हणाले.

देशाचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील या कारवाईशी संबंधित सुरक्षा मोहिमांमध्ये सहभागी होते. मग गिरीश महाजन हे त्यांच्या भूमिकेचाही निषेध करणार आहेत का? त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहेत का?असा सवाल सपकाळ यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT