Girish Mahajan, Bharat Gogawale Pudhari
मुंबई

Nashik Raigad Guardian Minister | अखेर तिढा सुटला : नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन, तर रायगडची धुरा भरत गोगावले यांच्याकडे

अखेर राजकीय चर्चांना पूर्णविराम, दीड वर्षांपासून दोन्ही पदे होती रिक्त

पुढारी वृत्तसेवा

Nashik Raigad Guardian Minister Appointments

मुंबई : महायुती सरकारमध्ये गेल्या दीड वर्षांपासून चर्चेचा आणि अंतर्गत वादाचा विषय ठरलेल्या नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तर रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती सोमवारी (दि.१७) जाहीर करण्यात आली. राज्यपाल यांच्या आदेशानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर ही नियुक्ती करण्यात आली.

दीड वर्षांपासून दोन्ही पदे होती रिक्त

महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे, तर रायगडची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, या निर्णयावर शिवसेना शिंदे गटातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

रायगडसाठी मंत्री भरत गोगावले आग्रही होते, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या नावाचीही चर्चा होती. महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेद वाढल्यानंतर सरकारने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री नियुक्तींना स्थगिती दिली. परिणामी दोन्ही जिल्ह्यांना दीर्घकाळ पालकमंत्री मिळाला नव्हता.

नाशिकची जबाबदारी पुन्हा गिरीश महाजनांकडे

नाशिक जिल्ह्याची जबाबदारी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आगामी काळात नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि प्रशासनाशी संबंधित कामे होणार आहेत. त्यामुळे पालकमंत्री म्हणून महाजन यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

भरत गोगावलेंची प्रतीक्षा संपली, अदिती तटकरे यांना धक्का

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरतशेठ गोगावले हे सुरुवातीपासूनच आग्रही होते. रायगडचे स्थानिक नेते आणि मंत्री म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आपल्याकडे असावी, अशी त्यांची भूमिका होती. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या अदिती तटकरे यांनीही पदासाठी राजकीय ताकद लावली होती.

त्यानंतर रायगडचे पालकमंत्रिपद तटकरे यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, गोगावले यांच्या समर्थकांकडून या निर्णयाला विरोध झाला होता. त्यानंतर हे पद दीर्घकाळ रिक्त राहिले. गेल्या काही महिन्यांत गोगावले यांच्या नावाची पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

अखेर राजकीय चर्चांना पूर्णविराम

गेल्या दीड वर्षांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची, तर भरतशेठ गोगावले यांच्याकडे रायगडची जबाबदारी सोपवून महायुती सरकारने दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवला आहे.

मला पांडुरंग पावला : गिरीश महाजन यांची पंढरपुरात प्रतिक्रिया

पंढरपुरात आल्यानंतर देवाचे दर्शन करताना मला ही बातमी समजली. त्यामुळे मला पांडुरंग पावला आहे. आपण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. नाशिक मध्ये खड्ड्यांसाठी काही लोक आंदोलन करत आहेत, मोर्चे काढत आहेत. नाशिकचे रस्ते सिमेंटचे करायचे आहेत. थोडा त्रास सहन करावा लागेल. मात्र नाशिक स्वच्छ आणि सुंदर होईल. अगोदर कुंभमेळा मंत्री होतो. आता पालकमंत्री झालो असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT