घाटकोपर: मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवरून एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या जन्मदात्या वडिलांनीच खाली फेकल्याची धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आरोपी वडिलांना तात्काळ अटक केली आहे.
आरोपीचे नाव जाफर शेख (२३ वर्षे) असून, तो घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. त्याची पत्नी आरती शेख (२२ वर्षे) हिच्यासोबत त्याचा २ वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि त्यांना आरव नावाचा ९ महिन्यांचा मुलगा आहे.
आरोपी जाफरला नशेचे व्यसन असल्याने पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार भांडणे होत होती. रविवारी रात्री ८ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास सुमारास आरती बाळासह घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर उभी असताना जाफर तिथे आला आणि त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला.
वादाच्या भरात जाफरने आरतीच्या हातातून ९ महिन्यांच्या आरवला ओढून घेतले आणि त्यानंतर तो त्याला घेऊन तिथून जात असताना त्याच्या आईने आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला. याच वेळी रागाच्या भरात रात्री ८ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास आरोपीने मुलाला २० फूट उंचीच्या स्कायवॉकवरून थेट खाली फेकून दिले.
आरोपीला घटनास्थळीच अटक
या घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने आरोपीला घटनास्थळीच पकडण्यात आले होते. पत्नी आरती शेख हिने दिलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी आरोपी जाफर शेखविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. घाटकोपर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
चिमुकल्याची सायन रुग्णालयात मृत्यूशी झुंज
घाटकोपर पश्चिम येथील अलबेला शॉपसमोरील रेल्वे स्थानक रस्त्यावर बाळ खाली पडताच रक्ताच्या थारोळ्यात पडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक लीना लोहार व पोलीस शिपाई भरत ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरतीने आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीसांच्या मदतीने बाळाला त्याला प्रथम राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला पुढील उपचारांसाठी सायन (शीव) रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले आहे. सध्या हा चिमुकला मृत्यूशी झुंज देत आहे.