कुर्ला: अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच जमावाने मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घाटकोपर परिसरात घडली आहे. याबाबत घाटकोपर पोलिसांनी 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
घाटकोपरच्या नित्यानंद नगर परिसरातील हजीमुल्ला चाळ येथे काहीजण एका इसमाला मारहाण करत असल्याची माहिती घाटकोपर पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार घाटकोपर पोलीस ठाण्याचे तीन ते चार पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी पोलिसांनी याठिकाणी चौकशी केली असता, एका इसमाने याठिकाणी दोन अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर याठिकाणी जमलेल्या जमावाने या आरोपीला बेदम मारहाण केल्याने तो स्वतःला वाचवण्यासाठी एका घरात लपून बसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.
त्यानुसार पोलिसांनी जमावाला बाजूला करत या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आरोपीला पकडून बाहेर आणले. यावेळी काही जणांनी पुन्हा एकदा या आरोपीवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, गर्दीमधील काही जणांनी पोलिसांना देखील मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी एका इसमाने पोलीस शिपाई कोळी यांच्या डोक्यात हेल्मेट घातल्याने त्यांना यामध्ये मोठी दुखापत झाली आहे. अखेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.