मुंबई : घाटकोपरमधील के.व्ही. के. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलेल्या 17 शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कपात केले होते. यासंदर्भात शिक्षक संघटनेकडून ठाम भूमिका घेत लेखी तक्रार करण्यात आली होती. या संदर्भात दैनिक पुढारीने वृत प्रसिद्ध केल्यानंतर अखेर या 17 शिक्षकांना न्याय मिळाला आहे. मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षकांनी 17 शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पुन्हा काढून तत्काळ अदा करण्याचे निर्देश संस्थाचालकांना दिले आहेत.
घाटकोपर पश्चिमेकडील के. व्ही. के. शाळेतील 17 शिक्षकांची महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलेल्या या शिक्षकांचे सहा महिन्यांनंतर एक दिवसाचे वेतन शाळा प्रशासनाने कपात केले होते. या विरोधात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने भूमिका घेत शिक्षण निरीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार करत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. यानंतर दै. पुढारीने 11 डिसेंबरच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली होती.
काय होते प्रकरण...
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक दरम्यान राज्यातील विविध शाळांमधील शिक्षकांची निवडणूक आयोगाकडून निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती केली होती. त्यासाठी ऑक्टोबरमध्ये शिक्षकांसाठी प्रशिक्षण ठेवले होते. शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना उपस्थित राहणे बंधनकारक केले होते. त्यानुसार घाटकोपर पश्चिमेकडील के.व्ही.के. हायस्कूलमधील 17 शिक्षकांची निवडणूक प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार नियुक्ती केलेले सर्व शिक्षक निवडणूक प्रशिक्षणास 21 ऑक्टोबर रोजी उपस्थित राहिले होते.